मध्य नागपुरात राडा, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा ईव्हीएम असलेल्या कारवरच हल्ला
By योगेश पांडे | Published: November 20, 2024 09:38 PM2024-11-20T21:38:24+5:302024-11-20T21:39:09+5:30
भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने : परिसरात तणाव, पोलिसांची दमछाक
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दिवसभर काही ना काही कारणाने तणावात असलेल्या नागपूर मध्य मतदारसंघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चक्क अतिरिक्त ईव्हीएम मशीन असलेल्या निवडणूक आयोगाच्या कारवरच काही तरुणांनी हल्ला केला. संबंधित कारची तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस विभागाकडून हल्ला करणारे तरुण काँग्रेस कार्यकर्ते होते व गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर मध्यमधील किल्ला परिसरातील बूथ क्रमांक २५८ च्या परिसरात सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान ही घटना घडली. स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम घेऊन जाणारी एमएच ३१ सीपी ३२२९ ही गाडी मतदान केंद्राच्या बाहेर निघाली. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबविली. त्यांनी शिवीगाळ करीत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी एमएच १९ बीयू ६०२७ ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले. तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले. ही बातमी पसरताच भाजप व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले. मात्र, पोलिसांनी सर्वांना तेथून पिटाळून लावले. यावेळी भाजपचे नागपूर मध्यमधील उमेदवार प्रवीण दटके हेदेखील आक्रमक झाले होते व पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
बंटी शेळकेंनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप
दरम्यान, भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यानंतर मोठा राडा झाला. बंटी शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शेळके यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले होते. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडीदेखील निर्माण झाली होती.
गैरसमजातून झाला नागपूर मध्यमधील गोंधळ
दरम्यान, नागपूर मध्यमधील राडा हा गैरसमजातून झाल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी एक डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी झेरॉक्स केंद्रावर गेला होता. त्यांच्याजवळ त्यावेळी अतिरिक्त ईव्हीएम मशीनदेखील होत्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या हे नजरेस पडले व त्यांनी ते ईव्हीएम मशीन स्वत:सोबत का नेत आहेत, असा सवाल उपस्थित करीत आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे गैरसमज आणखी वाढला व त्यातूनच संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड केली. यानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर आमनेसामने आले. संबंधित झोनल अधिकारी मतदान केंद्रावर परतले असून, पॅकिंगची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संपूर्ण प्रकारात ईव्हीएम मशीनचे कुठलेही नुकसान झालेले नाही, असे पोलिसांकडून अधिकृतपणे सांगण्यात आले.