ठरलं..! देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे नागपुरातील उमेदवार शुक्रवारी भरणार अर्ज
By योगेश पांडे | Published: October 23, 2024 10:26 PM2024-10-23T22:26:23+5:302024-10-23T22:26:59+5:30
संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली.
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य उमेदवारांच्या निवडणूक अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. २५ ऑक्टोबर रोजी सर्व जाहीर उमेदवार फॉर्म भरतील. यावेळी भाजपकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत भाजपने एकच यादी जाहीर केली असून दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्चिम), कृष्णा खोपडे (नागपूर पुर्व), मोहन मते (नागपूर दक्षिण) यांची नावे होती. इतर तीनही मतदारसंघातील उमेदवारांची नावे होल्डवर आहेत. ती यादी गुरुवारी किंवा शुक्रवारी घोषित होण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष व कामठीतील उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील त्याच दिवशी अर्ज दाखल करतील. शुक्रवारी सकाळी संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली.