लाडकी बहीण झाली जागरूक; नागपुरात महिलांच्या मतदानात आठ टक्क्यांनी वाढ
By योगेश पांडे | Published: November 21, 2024 11:57 PM2024-11-21T23:57:26+5:302024-11-21T23:59:21+5:30
दक्षिण, मध्य, उत्तरमध्ये घसघशीत वाढ : लाडक्या बहिणींचा महायुतीला कौल की महाविकास आघाडीला फायदा?
योगेश पांडे, नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अंतिम आकडे समोर आले असून, मागील वेळच्या तुलनेत नागपुरात ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात ६.३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाही नागपूरकरांना मतदानाचा ‘फर्स्ट क्लास’ गाठण्यात अपयश आले असले तरी महिला मात्र कमालीच्या जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. उपराजधानीत मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ७.९७ टक्क्यांनी महिलांचे मतदान वाढले आहे. आता या लाडक्या बहिणींच्या महायुतीला फायदा होणार की महाविकास आघाडीला महिलांचा कौल मिळणार याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.
‘लोकमत’ने नागपुरातील सहाही मतदारसंघातील २०१९ व २०२४ च्या केवळ ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानाची तुलना केली असता वरील बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपूर शहरात ईव्हीएमद्वारे मतदान करणारे २२ लाख ९ हजार १४५ मतदार होते. त्यातील ११ लाख १९ हजार ८२५ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५३.१९ टक्के व महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४८.११ टक्के इतकीच होती. मात्र यावेळेस महिलांनी नागपुरात कमाल केली आहे. यावेळेस नागपुरात ११ लाख ७९ हजार ८१४ पैकी ६ लाख ८४ हजार २३३ पुरुषांनी मतदान केले, तर १२ लाख २ हजार ९५६ महिलांपैकी ६ लाख ७४ हजार ६१८ जणींनी ईव्हीएमवर मतदानाचे कर्तव्य बजावले. यावेळी पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५७.६० टक्के व महिलांचा टक्का ५६.०८ टक्के इतका आहे. २०१९ च्या तुलनेत पुरुषांचे मतदान ४.४१ टक्क्यांनी वाढले, तर महिलांचे मतदान ७.९७ टक्क्यांनी वाढले.
महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद
जर नागपूर शहरातील सहाही मतदारसंघाच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर उत्तर नागपुरात २०१९ च्या तुलनेत महिलांच्या मतदानात सर्वाधिक ८.७७ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल मध्य नागपूर (८.४४ टक्के), दक्षिण नागपूर (८.१६ टक्के) या मतदारसंघात मोठी वाढ झाली आहे. दक्षिण-पश्चिममध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत महिलांचे मतदान ५.९६ टक्के वाढ आहे. याशिवाय पूर्वमध्ये महिलांचे मतदान ७.९३ टक्क्यांनी वाढले.
असे आहे मतदान
दक्षिण पश्चिम नागपूर
वर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान
२०१९ : ५१.४१ : ४८.३३ : ४९.८७ : ५०.०२
२०२४ : ५४.९२ : ५४.२९ : ५४.५९ : -
दक्षिण नागपूर
वर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान
२०१९ : ५२.६० : ४७.९८ : ५०.३० : ५०.६१
२०२४ : ५७.८६ : ५६.१४ : ५६.९९ : -
पूर्व नागपूर
वर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान
२०१९ : ५५.८२ : ५०.५८ : ५३.३० : ५३.४१
२०२४ : ६०.३२ : ५८.५१ : ५९.४२ : -
मध्य नागपूर
वर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान
२०१९ : ५४.८१ : ४६.४० : ५०.६४ : ५०.७४
२०२४ : ५०.५८ : ५४.८४ : ५७.१७ : -
पश्चिम नागपूर
वर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान
२०१९ : ५१.५३ : ४६.८९ : ४९.२४ : ४९.४१
२०२४ : ५६.२६ : ५५.३१ : ५५.७८ : -
उत्तर नागपूर
वर्ष : पुरुष : महिला : एकूण (ईव्हीएम) : एकूण मतदान
२०१९ : ५३.१६ : ४८.३२ : ४९.९९ : ५०.९०
२०२४ : ५९.०४ : ५७.०९ : ५८.०५ : -
२०१९ मधील एकूण मतदान (केवळ ईव्हीएम)
एकूण : पुरुष : महिला : एकूण
मतदान : ५,९५,४३६ : ५,२४,३८९ : ११,१९,८२५
एकूण मतदार : ११,१९,२८१ : १०,८९,८६४ : २२,०९,१४५
२०२४ मधील एकूण मतदान (केवळ ईव्हीएम)
एकूण : पुरुष : महिला : एकूण
मतदान : ६,८४,२३३ : ६,७४,६१८ : १३,५८,८५१
एकूण मतदार : ११,७९,८१४ : १२,०२,९५६ : २३,८२,७७०
एकूण मतदान टक्केवारी
२०१९ : ५३.१९ : ४८.११ : ५०.६९
२०२४ : ५७.६० : ५६.०८ : ५७.०३