प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
By जितेंद्र ढवळे | Published: November 18, 2024 09:23 PM2024-11-18T21:23:29+5:302024-11-18T21:27:50+5:30
जलालखेडा परिसरातील घटना; नरखेड येथून सांगता सभा आटपून परत येत असताना अज्ञान व्यक्तीकडून दगडफेक
काटोल : राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काटोल मतदारसंघातील नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख हे तीनखेडा-भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल-जलालखेडा रोडवरील बेल फाट्याजवळील ब्रेकरजवळ गाडी आली असता चार युवक अचानक गाडीसमोर आले. यातील एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. यानंतर एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. यात रक्तस्राव झाल्याने देशमुख यांची प्रकृती बिघडली. लगेच त्यांना उपचारासाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. देशमुख यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच काटोल पोलिसांचा ताफाही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. या ठिकाणी निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी देशमुख यांचे स्वीय सहायक उज्ज्वल भोयर यांच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
असा झाला हल्ला
घटनेच्या वेळी गाडीच्या मागील सीटवर त्यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी, स्वीय सहायक उज्ज्वल भोयर बसलेले होते तर देशमुख हे समोरील सीटवर चालकाच्या बाजूला बसले होते. हल्लेखोरांनी गाडी ब्रेकरजवळ हळू झाली असताना समोरील बाजूने अचानक दगड भिरकावले. यातील एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. यात त्यांना गंभीर इजा झाली. या घटनेची माहिती मिळताच देशमुख यांचे पुत्र सलील आणि ऋषी व दोन्ही सुनांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
प्राथमिक उपचारानंतर नागपूरला रवाना
काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. सचिन चिंचे यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्यावर प्राथमिक उपचार केले. जखमेच्या जागेवर सुजन आल्याने डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. या काळात देशमुख यांचा रक्तदाबही वाढला होता.
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना आम्ही अतिशय गंभीरतेने घेतली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तातडीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. हा हल्ला नेमका कसा झाला याबाबत कुठलाही निष्कर्ष काढता येणार नाही. सखोल तपासानंतरच नेमके तथ्य समोर येईल. त्या दिशेनेच पोलिसांचा तपास सुरू आहे. - हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण