प्रफुल्ल पटेलांबाबत तुमची भूमिका काय? अंबादास दानवे यांचा फडणवीसांना खडा सवाल
By मंगेश व्यवहारे | Published: December 8, 2023 12:11 PM2023-12-08T12:11:20+5:302023-12-08T12:12:15+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2023: राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे.
- मंगेश व्यवहारे
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. त्यात दाऊदच्या खास हस्तकासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांबाबत जाहीर केलेल्या पत्राने खळबळ माजली आहे. या पत्राची दखल घेत अंबादास दानवे यांनी फडणवीसांना पत्र लिहीले आहे. विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण बिरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले. पण, अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमिल शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने 'ईडी'ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे.
नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो, असा मजकुर दानवे यांच्या पत्रात आहे. दानवे यांच्या या पत्राने आता प्रफुल्ल पटेल महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आले आहेत.