आता परीक्षा केंद्रावर उशीर झाल्यास मिळणार नाही प्रवेश; राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 11:20 AM2022-03-16T11:20:44+5:302022-03-16T13:19:22+5:30
आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे.
नागपूर : बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. सकाळच्या वेळेतील पेपर १०.३० वाजता व दुपारच्या वेळेतील पेपर ३ वाजता सुरू होतात. आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे.
बोर्डाच्या निदर्शनास आले की १० मिनीट सवलतीचा लाभ घेऊन केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेत आलेला काही आशय निदर्शनास आला. ही बाब मंडळाने गंभीरतेने घेऊन संबंधितांवर कारवाईदेखील केली; परंतु या गैरप्रकारावर प्रतिबंध घालण्यासाठी मंगळवारी बोर्डाने परिपत्रक काढले असून यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला पेपर सोडविता येणार नाही.
- परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत
१) विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी किमान १ तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
२) विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनीट अगोदर परीक्षा कक्षात हजर राहावे.
३) परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देऊ नये.