महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र दिंडीने घडवला शतकातील वळणांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 10:22 PM2019-05-02T22:22:26+5:302019-05-02T22:27:34+5:30
आजचा उद्यमी व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले. मराठी माणसाने विश्व पादाक्रांत केले ते याच महाराष्ट्रातील पोषक संस्कारांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे, मग ते संत महात्मे असोत, क्रांतिकारी देशभक्त पुढारी असोत. उद्योजक, साहित्यिक, कीर्तनकार- प्रवचनकार, चित्रपट-नाट्य निर्माते-दिग्दर्शक-कलाकार, समाजसुधारक आदी आदी. या सगळ्यांच्या प्रेरणेने आजचा महाराष्ट्र पुरोगामी, सृदृढ व मार्गदर्शक सकारात्मक विचारांचा आहे. महाराष्ट्र घडताना शतकाचा प्रवास व्हावा लागला आणि त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वळणे घेत घेत महाराष्ट्र आपली विजय पताका फड़कवतो आहे याचेच दर्शन नृत्य-नाट्य-गायनाच्या मध्यमाने घडविणारा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्यावतीने आयोजित करण्यात आला. निमित्त होते महाराष्ट्र दिनाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजचा उद्यमी व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले. मराठी माणसाने विश्व पादाक्रांत केले ते याच महाराष्ट्रातील पोषक संस्कारांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे, मग ते संत महात्मे असोत, क्रांतिकारी देशभक्त पुढारी असोत. उद्योजक, साहित्यिक, कीर्तनकार- प्रवचनकार, चित्रपट-नाट्य निर्माते-दिग्दर्शक-कलाकार, समाजसुधारक आदी आदी. या सगळ्यांच्या प्रेरणेने आजचा महाराष्ट्र पुरोगामी, सृदृढ व मार्गदर्शक सकारात्मक विचारांचा आहे. महाराष्ट्र घडताना शतकाचा प्रवास व्हावा लागला आणि त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वळणे घेत घेत महाराष्ट्र आपली विजय पताका फड़कवतो आहे याचेच दर्शन नृत्य-नाट्य-गायनाच्या मध्यमाने घडविणारा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्यावतीने आयोजित करण्यात आला. निमित्त होते महाराष्ट्र दिनाचे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून कला अकादमी पुरस्कार विजेते डॉ. विनोद इंदूरकर व ज्येष्ठ नाट्य निर्माते दिग्दर्शक संजय पेंडसे उपस्थित होते. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे उपसंचालक मोहन पारखी यांच्या हस्ते अतिथींचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी, प्रेमस्वरूप तिवारी, गोपाल बेतावार, शशांक दंडे, कार्यक्रम समिती सदस्य कुणाल गडेकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून आगळ्यावेगळ्या दृकश्राव्य ‘महाराष्ट्र दिंडी’ या कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
नागपुरातील संगीत- नाट्य -कलाक्षेत्रात असलेले प्रफुल्ल माटेगावकर यांची संकल्पना व निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मराठी मातीचे गुणगान गाणाऱ्या सुश्राव्य पोवाड्याने झाली. १२ व्या शतकापासून ते २१ व्या शतकपर्यंतच्या महत्त्वाच्या वळणांचा मागोवा या कार्यक्रमाच्या माध्यमाने घेण्यात आला. राजमाता जिजाऊ, राजे शहाजी तसेच स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना, महात्मा ज्योतिबा फुले -सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज सुधारणेसाठी, शिक्षणासाठी, पददलितांसाठीचे कार्य, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकवि विनायक दामोदर सावरकर यांचे प्रेरक विचार आदी नाट्यप्रवेशासह साकार करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील बदलांचा व समाजप्रभावाचा उल्लेख करुन त्यातील नाट्यगीते, चित्रपटगीतेही अत्यंत रंजक पध्दतीने नृत्यांच्या माध्यमाने साकारण्यात आली. अभिषेक बेल्लारवार यांच्या नाट्यचमूने व श्रीकांत धबडगांवकर यांच्या नृत्य चमूने अत्यंत सुबकतेने व परिणामकारक सादरीकरण केले.
नागपुरातील गायक कलाकार गुणवंत घटवई, सारंग जोशी, सोनाली दीक्षित, सायली कुळकर्णी-मास्टे यांच्या गायनाला परिमल जोशी, अमर शेंडे, गौरव टांकसाळे, मोरेश्वर दाहसहस्त्र, अशोक डोके, अक्षय हर्ले व विक्रम जोशी यांची उत्कृष्ट साथसंगत लाभली.
कार्यक्रमात शतकांतील वळणांचा प्रवास आपल्या सुंदर निवेदनाने प्रफुल्ल माटेगावकर यांनी मांडला. समाजाकरिता आपले सर्वस्व वाहून केवळ एकट्याने नव्हे तर संपूर्ण परिवारासह पुढील येणाऱ्या पिढ्याही समाजाकरिता आपले सर्वस्व देण्यास समर्थ आहे. याची प्रेरणा देणारा बाबा आमटे यांच्या कार्याचा उल्लेख, तसेच प्रकाश आमटे यांचे विचार पडद्यावर प्रत्यक्ष साक्षात्काराच्या निमित्ताने साकारले जाणे हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा टप्पा झाला.
कार्यक्रमाची संहिता नागपुरातील प्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक, निर्माता लेखक, दिग्दर्शक व अभिनेते सलीम शेख यांची होती. संगीत संयोजन आनंद मास्टे यांचे तर तांत्रिक सहकार्य विनय मोडक यांचे होते.