अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ, ढिशकॅव.. ढिशकॅव..ढिशकॅव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 12:17 PM2018-05-02T12:17:13+5:302018-05-02T12:17:13+5:30

१ मे महाराष्ट्रदिनानिमित्त नरखेड तालुक्यातील उमठा गावकऱ्यांचा श्रमएल्गार

Maharashtra Day; Shramadan at Umtha in Nagpur district | अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ, ढिशकॅव.. ढिशकॅव..ढिशकॅव...

अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ, ढिशकॅव.. ढिशकॅव..ढिशकॅव...

Next

वर्षा बाशू
नागपूर:
लोकमत न्यूज नेटवर्क
अन्न गुडगुडे.. नाल गुडगुडे.. दुष्काळ, ढिशकॅव ढिशकॅव अशी जोशपूर्ण घोषणा देत १ मेच्या मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यातील उमठा गावातील एका टेकडीच्या पायथ्याशी मशाली पेटवून गावकरी महाश्रमदानाच्या संग्रामाला प्रारंभ करतात. सलग २४ तास काम करण्याचा संकल्प करून गावातले लहान, मोठे आणि स्त्रिया तेथे एकत्र जमलेले असतात. मशालींच्या उजेडात ध्वजारोहण केले जाते. श्रमदानाची शपथ घेतली जाते आणि टेकडीच्या पायथ्याशी सुरू होतो श्रमशक्तीचा अखंड यज्ञ.
हे निमित्त असते १ मे रोजीच्या महाराष्ट्रदिनानिमित्त पाणी फाऊंडेशनने केलेल्या महाश्रमदानाच्या आवाहनाचे.
उमठा हे गाव तसं लहानसं. लोकसंख्या अवघी ८१२ च्या घरातली. मुख्य व्यवसाय शेती आणि शेतमजुरी. गावात फक्त चौथीपर्यंतच शाळा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक प्रार्थना मंदिर. येथे दररोज संध्याकाळी नियमितपणे भजने गायली जातात. हे मंदिर म्हणजे गावाचे हृदयच जणू.
पाणी फाऊंडेशनने जाहीर केलेल्या वॉटर कप स्पर्धेचे काम ८ एप्रिलपासून सुरू झाले आहे. नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. उन्हातान्हाची पर्वा न करता गावकरी झपाटल्यासारखे काम करत आहेत. त्यांचा हा निश्चयी झपाटा थक्क करणारा आहे.

उमठा गावातील शिदोरीकाला
विदर्भातला कडक उन्हाळा रंगात आलेला आहे. तापमानाचा पारा ४४-४५ च्या दरम्यान झुलतोय. अशात ३० एप्रिल रोजी भर दुपारच्या १२ वाजता उमठ्यातील महिला जेवणाचे डबे घेऊन निघतात. दीड-दोन किलोमीटर दूरवर सुरू असलेल्या शेततळ्यावर जातात. तिथे पहाटेपासून काम करत असलेल्या गावकºयांसाठी त्यांनी शिदोरी काला आणलेला असतो. श्रीकृष्ण जयंतीचा गोपालकाला सर्वांना ठाऊक असेल. आजच्या संगणक युगात शिदोरी काला घेऊन जाण्याची ही प्रथा उमठा गावाने कित्येक वर्षांपासून अंगिकारली आहे.
३० एप्रिल रोजी असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीदिनी गावातील सर्व जण श्रमदान करतात आणि शिदोरी काला करतात. यात असते पोळी, भात आणि डाळ भाजी. शेतात सर्व डबे एकत्र केले जातात आणि तुकडोजी महाराजांचे भजन गाऊन त्याचा आस्वाद घेतला जातो.

फासेपारध्यांची चार दिवस मजुरी तर तीन दिवस श्रमदान
उमठा गाव काही काळापूर्वी फासेपारधी आणि गावठी दारूबाबत ओळखले जायचे. या गावातील विघे गुरुजींनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा निर्धार केला. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहिले. दारुच्या व्यवसायापासून परावृत्त करीत राहिले. त्याचा परिणाम असा की, गावातील तीस-चाळीस फासेपारधी तरुण श्रमदानात दररोज येतात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय बुडाला तर कुटुंबाची चूल कशी पेटेल या विचाराने त्यांचे श्रमदान हे रोजगार हमी योजनेअंतर्गत दाखवून त्यांना रोजी दिली जाते. मात्र या पारधी बांधवांनी आपल्या सहृदयतेचा व दिलेरीचा परिचय देत, सात दिवसांपैकी फक्त चार दिवसांचीच रोजी घेण्याचे ठरवले व तीन दिवस गावासाठी म्हणून श्रमदान करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार ते काम करीत आहेत.

बरडपवनीच्या सात मुलींनी कसली कंबर
नरखेड तालुक्यातील बरडपवनी गावातील नोका मातेचे मंदिर असलेल्या टेकडीवर काम सुरू आहे. येथील कामाचे मुख्य वैशिष्ट्य हे की गावातील जवळपास दोनशे स्त्रियांनी मार्चपासून यात पुढाकार घेतला. पुरूषांची संख्या अगदीच कमी होती. सध्या येथे फक्त तीन मुले आहेत बाकी सर्व मुली व स्त्रियाच काम सांभाळत आहेत. विशेषत: तरूण मुलींचा सहभाग, कामाचा झपाटा आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. यापैकी सात मुलींनी एकदा सलग चोवीस तास काम करून दहा ते पंधरा शोषखड्डे तयार केले. या मुली १७ ते २२ या वयोगटातील आहेत. गावच्या सरपंच निलिमा बंडोपंत उमरकर यांचा मोठा सहभाग आहे. ज्यांना शेतीविषयक काहीच माहिती नव्हती. त्यांना गावातील स्त्रियांना तयार केले. शेतीविषयक सर्व माहिती मिळवली. त्याही आता पूर्ण वेळ श्रमदानात असतात.

आधी काम करू द्या, मग लग्नासाठी पहायला या
बरडपवनीतील तरुण मुली रात्रंदिवस श्रमदानाच्या कामात गढल्यामुळे गावात मुली पाहण्याचा कार्यक्रमच सध्या ठरत नाही अशी माहिती मिळाली. मुलाकडचा निरोप आला तरी, आधी हे काम संपू द्या मग पहायला या, असा निरोप मुलीच्या घरच्यांकडून मुलाच्या घरच्यांना दिला जातो आहे.

अभिनेता जितेंद्र जोशी यांचे श्रमदान व वनभोजन
तुफान आलंया या कार्यक्रमाचे अँकर व अभिनेते जितेंद्र जोशी यांनी उमठा गावात दोन दिवस मुक्काम ठोकला होता. मी सेल्फी काढायला आलेलो नाही तर काम करायला आलो आहे, असा सेल्फीसाठी पुढे सरसावलेल्या तरुणांना प्रारंभीच दम भरत जोशी यांनी त्यांच्या बरोबरीने काम सुरू केले. उमठा येथील शेततळ््याची पाहणी केली. गावकऱ्यांसोबत वन

भोजनाचा आनंद घेतला. १ मे रोजी उमठाच्या टेकडीवर जाऊन चर खणण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले.

जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनीही सरसावल्या बाह्या आणि उचलली कुदळ
१ मे रोजी उमठा गावात जणू श्रमजत्रा भरली होती. सकाळपासूनच जवळपासच्या शहरांमधून श्रमदानासाठी येणाऱ्यांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. वेगवेगळ््या बँकांचे कर्मचारी-अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वैद्यकीय विद्यार्थी असे हजारोच्या संख्येने येथे गोळा झाले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका चराचे काम त्यांनी सुरू केले व कुदळ फावड्याने बराचसा चर खणून तयार केला.

खैरगावात पोलिओग्रस्त ते सेवानिवृत्त लष्करी जवानांचा सहभाग
नरखेड तालुक्यातल्या खैरगावातील नंदकिशोर बानाईत या ४३ वर्षांच्या गृहस्थांना लहानपणीच पोलिओ झाल्याने त्यांचे दोन्ही पाय लुळे झाले आहेत.
ते येथे सुरू असलेल्या नाली बंदिस्तीकरणाच्या कामावर दररोज येतात. त्यांच्याकडून जे जमेल ते काम करत राहतात. तसेच गणेश चौधरी हे सेवानिवृत्त जवान पूर्णवेळ श्रमदानाच्या कामात सहभागी होतात. हे आपल्या गावचे काम आहे, ते केलेच पाहिजे असा भाव यामागे असतो.

गायमुख पांढरीतील चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा
अवघे गाव झपाटल्यागत काम करताना पाहून शाळकरी विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळाली नाही तरच नवल. आम्हीही यात काम करतो असा हट्ट जेव्हा गायमुख पांढरीतील चौथ्या वर्गातल्या २० विद्यार्थ्यांनी धरला तेव्हा त्यांना हे मातीगोट्याचे काम कसे करू द्यायचे असा प्रश्न त्यांच्या पालकांपुढे उभा राहिला. त्यांच्यावर मग शेतात श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांच्या लहानसहान कामांची जबाबदारी सोपविली. पाणी आणून देणे, जेवणाचे डबे पोहचवणे अशा कामांसह पडतील ती व झेपतील ती सर्व कामे ही वानरसेना मोठ्या आनंदाने करताना दिसते.


एक हात खोदावी जमीन । हे पूजनाहूनि पूजन ।
परिणाम शेकडो व्याख्यानांहून। अधिक तयाचा ।।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या अठराव्या अध्यायात श्रमदानाचे महत्त्व असे विशद केले आहे. तुकडोजी महाराजांच्या वचनांना डोळ््यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या या गावकऱ्यांनी त्यांचे बोल खऱ्या अर्थाने खरे करून दाखवण्याचा विडा उचलेला आहे.

Web Title: Maharashtra Day; Shramadan at Umtha in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.