विदर्भाचा विकास करा महाराष्ट्राचे तुकडे नाही

By Admin | Published: December 19, 2015 03:01 AM2015-12-19T03:01:06+5:302015-12-19T03:01:06+5:30

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा शब्दांचा बागुलबुवा उभारून लाखो रोजगार निर्माण करण्याची वल्गना सरकारने केली होती.

Maharashtra does not have any pieces of development for Vidarbha | विदर्भाचा विकास करा महाराष्ट्राचे तुकडे नाही

विदर्भाचा विकास करा महाराष्ट्राचे तुकडे नाही

googlenewsNext

जयंत पाटील : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी
कमलेश वानखेडे नागपूर
मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा शब्दांचा बागुलबुवा उभारून लाखो रोजगार निर्माण करण्याची वल्गना सरकारने केली होती. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती पाहता हे सर्व कागदावरच राहिल्याचे दिसते. एक आणे, दोन आणे, चार आणे यांच्या नादाला लागून विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न न पाहता अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पहा. विदर्भाचा विकास करा, महाराष्ट्राचे तुकडे नाही, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडली.
विदर्भ-मराठ्यातील अनुशेषाबाबत नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी वर्षभरात सरकारने विदर्भ-मराठवाड्यासाठी केलेल्या कामाचा हिशेब मागितला. पाटील म्हणाले, बऱ्याच काळानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यामुळे विदर्भवासीयांना हर्षवायू झाला होता. मात्र वर्षभरातच विदर्भातील जनतेचा भ्रमनिरास झाला.
विदर्भात ४४ ठिकाणी भाजपचे कमळ फुलले, पण त्या कमळांचा विकासरूपी सुगंध मात्र विदर्भवासीयांना भेटला नाही. उरलेल्या काळात तरी विकासकामे पूर्ण करा नाहीतर याच ४४ ठिकाणी राष्ट्रवादीच्या घडाळ्याचा गजर आणि हाताचा छाप पडल्याशिवाय राहणार नाही, असा चिमटा त्यांनी काढला. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी सभागृहात केलेली भाषणे वाचून दाखवित त्यावेळी केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले, याचा लेखाजोखा सादर करण्याची मागणी केली. विदर्भात पाच ठिकाणी आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्रासाठी १२ कोटी खर्च करून हे काम मार्च २०१५ पर्यंत कार्यान्वित करायचे होते, वर्धा, भंडारा, नागपूर आणि अमरावती या चार जिल्ह्यांत सात निर्यात केंद्रे उभी करायची होती, नागपूर येथे टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जमीन संपादित केली होती, या सर्वांचे पुढे काय झाले, अशी विचारणा त्यांनी केली. मिहानची प्रगती मंदगतीने आहे. गडकरी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या टास्क फोर्सची आतापर्यंत केवळ एकच बैठक झाली. रिलायन्सने १०४ एकर जमीन मिहानमध्ये घेतली त्याचे केवळ ५० टक्केच पैसे भरले. ही सूट कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
परदेशी वाऱ्या करून ६५ हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यातला एकही प्रकल्प मुख्यमंत्री विदर्भात आणू शकले नाहीत. जो येईल तो प्रकल्प मुंबई-पुण्यात गेला. विदर्भाचे चित्र पालटण्यासाठी प्रकल्प कधी आणणार, असा सवाल करीत तुमच्या हातात असलेल्या सत्तेचा वापर विदर्भाच्या विकासासाठी करा, असा सल्ला पाटील यांनी दिला.

वाघाची झाली बकरी, रावते मात्र गप्पच
जयंत पाटील यांनी या वेळी शिवसेनेलाही लक्ष्य केले. ते म्हणाले, अ‍ॅड. अणेंचे वक्तव्य १५ दिवस होऊनही मुख्यमंत्र्यांना कळले नाही का. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्यावरून शिवसेनेचे सदस्य सभागृहात मध्यपर्यंत आले, मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान मानूम माघारी गेले. वाघाची बकरी झाल्यावर काय होते, हे आम्ही पाहिले, असा चिमटा त्यांनी शिवसेनेला काढला. मुख्यमंत्री म्हणाले होते, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी जात आमुची. कारण मुख्यमंत्र्यांना हे माहीत आहे की हे वाघ नाहीत, शेळी आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. या वेळी शिवसेनेचे बहुतांश सदस्य सभागृहात नव्हते. परिवहन मंत्री दिवाकर रावते समोरच्या बाकावर बसले होते. मात्र, त्यांनीही पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

Web Title: Maharashtra does not have any pieces of development for Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.