महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 07:40 PM2019-11-13T19:40:59+5:302019-11-13T19:42:35+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली.
नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. सायंकाळच्या सुमारास संघ मुख्यालयात दोघांमध्येही बंदद्वार चर्चा झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या भाजप नेत्याने संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालकांची घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर येऊ शकलेले नाही. मात्र राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढ्यामुळे या भेटीसंदर्भात राजकीय वतुर्ळात अनेक कयास लावले जात आहेत.
सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे ३५ मिनीटे ते संघ मुख्यालयात होते व अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. संघ मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर मुनगंटीवार यांनी चचेर्बाबत तपशील सांगण्यास नकार दिला. ही भेट खासगी होती. सत्तास्थापनेच्या तिढ्यासंदर्भात पक्षाचे नेते सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या मुद्द्यावर भाजपने तुर्तास तरी वेट अॅन्ड वॉच ह्याचीच भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरसंघचालकांची भेट घेतली होती. तर ७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सरसंघचालकांसोबत शहरातील एका ह्यडिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये ह्यचाय पे अल्पकालीन चर्चाही झाली होती.