सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 09:43 PM2019-11-07T21:43:16+5:302019-11-07T21:44:36+5:30
सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली.
नागपूर : सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ‘जिव्हाळा’ संस्थेतर्फे नागपुरातील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर दोघांमध्येही कार्यक्रमस्थळाखाली असलेल्या ‘डिपार्टमेन्टल स्टोअर’च्या कार्यालयात चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजकीय स्थितीवर चर्चा आधारित होती.
कार्यक्रम संपल्यावर दोघांच्याही प्रतिक्रियेसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाली होती. परंतु एकाही दरवाजाने ते बाहेर न पडल्याने सर्वच संभ्रमात पडले. सरसंघचालक व गडकरी दोघेही थेट कार्यक्रमाच्या सभागृहाखालील ‘डिपार्टमेन्टल स्टोअर’मध्ये पोहोचले होते. तेथील कार्यालयात राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अनिल सोले, भाजपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. १० ते १२ मिनीटे सर्व जण आत होते. त्यानंतर ते बाहेर पडले. आम्ही केवळ चहापानासाठी थांबलो होतो असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.