Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात जुने विरुद्ध नवे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:40 AM2019-10-20T03:40:32+5:302019-10-20T06:45:24+5:30

Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यातील ३२ मतदारसंघात दोन ते तीन मतदारसंघ सोडले तर सर्वच ठिकाणी चुरशीची लढत आहे.

Maharashtra Election 2019: Old vs new in East Vidarbha! | Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात जुने विरुद्ध नवे!

Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात जुने विरुद्ध नवे!

Next

नागपूर : पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यातील ३२ मतदारसंघात दोन ते तीन मतदारसंघ सोडले तर सर्वच ठिकाणी चुरशीची लढत आहे. किमान १० ठिकाणी तगडे बंडखोर उभे ठाकल्यामुळे युती-आघाडी यांच्यातील दुहेरी लढती आता तिरंगी वळणावर गेल्या आहेत. एकूण ३२ जागापैकी सध्या भाजपकडे २६, काँग्रेसकडे ४ व सेनकडे १ जागा आहे. काटोलची जागा रिक्त आहे.

नागपुरातून स्वत: राज्याचे मुख्यमंत्री लढताहेत ही संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारी बाब आहे. भाजपने बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांवरच विश्वास टाकला असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले जावे ही बाब अजूनही कुणाच्या पचनी पडलेली दिसत नाही. त्यांना डच्चू मिळाल्यामुळे वर्धा, कामठीसह काही ठिकाणी जातीय समीकरण बदलल्याचे चित्र दिसून आले.
अर्थात बावनकुळेंना पूर्व विदर्भाचे प्रचार प्रमुख करून भाजपने डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पण समाजात जो सिग्नल जायचा तो गेलाच.

भंडारा जिल्ह्यातील साकोलीची बीग फाईट (राज्यमंत्री परिणय फुके विरुद्ध नाना पटोले) प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हिंसक वळणावर गेली. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना झोडपून काढले. प्रकरण पोलिसात गेले.गडचिरोली जिल्ह्यात तीन आत्राम अहेरीतून लढत आहेत. यातील दोन आत्रामांनी आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आणली आहे. तर भंडारा, तुमसर येथे युतीतील धुसफूस पुढे आली.

पश्चिम विदर्भात मुद्द्यांचा अभाव

पश्चिम विदर्भात प्रचारादरम्यान मुद्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्यांच्या अभावी, प्रचार प्रामुख्याने अनुच्छेद ३७० सारखे राष्ट्रीय मुद्दे आणि जातीय समीकरणे आणि बंडखोरीच्या प्रभावाभोवतीच घुटमळत राहिला.
मतदारांच्या अनुत्साहामुळे बहुतांश मतदारसंघांमध्ये अखेरपर्यंत रंगत निर्माण झालीच नाही. मतदाराला ज्या मुद्यांच्या आधारे सत्ताधारी पक्षांच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करावेसे वाटावे, अशा मुद्यांच्या अभावी बहुतेक सर्वच मतदारसंघांमध्ये जातीय व मतविभाजनाची समीकरणे मांडली गेली. काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीमुळे मतविभाजनाची शक्यता खूप वाढली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात थेट लढती आहेत, गोंदियात भाजपच्या अग्रवालांना बंडखोर अग्रवालांनी आव्हान दिले आहे. वर्धा जिल्ह्यातील लढती २०१४च्या वळणावर जातील असे चित्र आहे.

विदर्भात प्रचारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, राज ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा आदी स्टार प्रचारक येऊन गेले.

Web Title: Maharashtra Election 2019: Old vs new in East Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.