Maharashtra Election 2019: नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:05 AM2019-10-22T04:05:33+5:302019-10-22T06:11:06+5:30
Maharashtra Election 2019:किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत
नागपूर : शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सावटाखाली झालेल्या मतदानाला मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.
सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले. दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या.
धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे तेथील मतदान केंद्रात शुकशुकाट होता. रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधांकडे कोणी लक्षच देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
राळेगावात पहिल्या लोकसभा निवडणूक साक्षीदाराचे मतदान
भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीचे साक्षीदार ठरलेले १०३ वर्षीय पुखराज उमीचंद बोथरा यांनी सोमवारी राळेगाव (जि. यवतमाळ)येथे मतदान केले. निवडणूक विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विशेष वाहनाद्वारे केंद्रावर दाखल होऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.