महाराष्ट्र एक्स्प्रेसला दोन दिवस ब्रेक; तीन रेल्वेगाड्यांचा बदलला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 09:57 PM2023-01-23T21:57:20+5:302023-01-23T21:58:01+5:30
Nagpur News नागपूरमार्गे धावणारी कोल्हापूर - गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र रेल्वे एक्स्प्रेस दोन दिवस धावणार नाही.
नागपूर : नागपूरमार्गे धावणारी कोल्हापूर - गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र रेल्वे एक्स्प्रेस दोन दिवस धावणार नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम तसेच कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वेगाडीला २६ आणि २७ जानेवारीला, तर २८ आणि २९ जानेवारीला गोंदिया ते कोल्हापूरला दोन दिवस ब्रेक दिला जाणार आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसला रद्द करण्यासोबतच तीन रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत. त्यानुसार १२१३० हावडा - पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २६ जानेवारीला आणि २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस २७ जानेवारीला नागपूर, बल्लारपूर, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंडमार्गे पुण्याला पोहोचणार आहे.
अशाच प्रकारे १२२२१ पुणे - हावडा - दुरंतो एक्स्प्रेस २८ जानेवारीला दौंड, वाडी, सिकंदराबाद, काजीपेठ, बल्लारपूर नागपूरमार्गे हावडा स्टेशन गाठणार आहे.
२८ जानेवारीला १२१२९ आझाद हिंद एक्स्प्रेस पुणे हावडा साईनगर शिर्डी येथून पाच तास विलंबाने निघेल. २२८९३ साईनगर शिर्डी - हावडा एक्स्प्रेस २८ जानेवारीला ४ तास विलंबाने निघेल.
गैरसोयीसाठी प्रशासनाची दिलगिरी
महाराष्ट्र एक्स्प्रेसने केवळ गोंदिया, नागपूरच नव्हे, तर विदर्भातील हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. दोन दिवस ही गाडी धावणार नसल्याने प्रवासाचा बेत करून ठेवणाऱ्या या मार्गावरच्या हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे.
----