महाराष्ट्र भारनियमन मुक्त : विश्वास पाठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:26 PM2018-12-01T22:26:26+5:302018-12-01T22:31:13+5:30
महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.
पाठक यांनी मागील चार वर्षातील उपलब्धीबाबत माहिती दिली. त्यांनी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार मेगावॅटवरुन विजेची मागणी २४९०० मेगावॅट झाल्याचे मान्य करून ५०० मेगावॅटचे लोडशेडिंग करण्यात आल्याचे सांगितले. परंतु याचा प्रभाव वीज वितरणाची हानी अधिक आहे तेथे पडला. तेम्हणाले, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेनुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न होत आहे. राळेगाव सिद्धी, यवतमाळच्या कोळंबी आणि नागपूरच्या खापात योजना सुरु झाली आहे. राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न आहे.
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग
पाठक यांनी सांगितले की, खर्च वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. सेंट्रलाईज्ड बिलींग सिस्टीममुळे बिलातील त्रुटी दूर होत आहेत. अॅपच्या साहाय्याने ग्राहक मीटरवर लक्ष ठेवू शकतात. भाजपाने वीज वितरण फ्रेन्चाईसीला कायम ठेवल्याबद्दल ते म्हणाले, नागपुरात फ्रेन्चाईसीमुळे विजेची हानी ३२ टक्क्यांवरून १३.६ टक्के झाली. ग्राहकांना लाभ देण्यासाठी फ्रेन्चाईसी सुरु आहे.
विदर्भात स्वस्त वीज अशक्य
पाठक यांनी विदर्भात स्वस्त वीज देण्याच्या मागणीबाबत सांगितले की, कुणाला स्वस्त वीज देणे शक्य नाही. राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाडात उद्योगांचे पलायन रोखण्यासाठी उद्योगांना एक हजार कोटीची सबसिडी दिली आहे.
शासनाचा भाग असलेल्या कार्यकर्त्यांवर टीका
भाजपा सरकारने सामाजिक कार्यकर्ते श्रमिक नेता प्रताप होगाडे आणि आशिष चंदराना यांना कृषी खर्चाच्या तपासासाठी गठित समितीत सामील केले. समितीचे अध्यक्ष विश्वास पाठक होते. कमिटीचा अहवाल आतापर्यंत आला नाही. याबाबत पाठक यांनी दोघांवर टीका करून कमिटीत सामील होऊनही त्यांनी विरोध कायम ठेवल्याने आयआयटीकडून अहवाल तयार करुन महावितरणला सोपविल्याचे सांगितले.
कोळसा संकटाचा सामना करण्याची तयारी
पावसाळ्यात कोळशाच्या खाणीत पाणी भरल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे पाठक यांनी सांगितले. पुढील वर्षी ही समस्या येणार नसून,महाजनकोशिवाय इतर स्रोतांपासून वीज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. देशाची चिंता करणे महावितरणची जबाबदारी नसल्याचे सांगून पाठक फसले. त्यांना कृषी जोडणीचा उपयोग इतर कारणांसाठी होत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, कंपनी चोरीच्या विरुद्ध जागरुक आहे. कठोर कारवाई करण्यात येते.