Maharashtra Government : नागपुरात भाजपात निराशा, महाराष्ट्र विकास आघाडीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:16 AM2019-11-27T00:16:27+5:302019-11-27T00:22:25+5:30
मागील तीन दिवसांपासून आनंदात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला व पक्षाच्या गोटात निराशेचे वातावरण होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीत समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणाने परत एकदा नाट्यमय कलाटणी घेतली व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मागील तीन दिवसांपासून आनंदात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना यामुळे धक्का बसला व पक्षाच्या गोटात निराशेचे वातावरण होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीत समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस हे नागपूरकर असल्याने येथील भाजपचे अनेक पदाधिकारी त्यांच्याशी भावनिक पातळीवरदेखील जुळलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जोरदार जल्लोष झाला होता. मात्र सत्तेच्या राजकारणात त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते निराश होते. एरवी बरेच जण ‘सोशल मीडिया’वर व्यक्त होताना दिसतात, मात्र मंगळवारी त्यांनी तेथेदेखील मौन राखले होते.
सायंकाळी उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्याने पुढील मुख्यमंत्री तेच असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर शिवसेनेतर्फेदेखील जल्लोष करण्यात आला. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेदेखील दुपारी आनंद साजरा करण्यात आला.
शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष
गणेशपेठस्थित शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली व मिठाईचे वाटप केले. जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, किशोर कुमेरिया, राजू तुमसरे, गुड्डू रहांगडाले, शेखर खरवडे, दिगंबर ठाकरे, राजा रामदवार, गजानन चकोले, पुरुषोत्तम कंद्रीकर, मनोज शाहू, संजय कसोधन, सुनील बॅनर्जी, दिगंबर ठाकरे, विकास आंभोरे, किशोर ठाकरे, नितीन साळवे इत्यादी उपस्थित होते. यावेळी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांनादेखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आनंदोत्सव
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सिव्हिल लाईन्स येथे माजी मंत्री व आ.अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमीप आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात आतषबाजीदेखील करण्यात आली व ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ताल धरला. यावेळी नगरसेवक दुनेश्वर पेठे, महिला मोर्चा अध्यक्ष अलका कांबळे, नूतन रेवतकर, महेंद्र भांगे, रिजवान अंसारी, अनिल बोकडे, तौसीफ शेख, विक्रांत देशमुख हेदेखील उपस्थित होते.
हा संविधानाचाच विजय
संविधानाची पायमल्ली करत महाराष्ट्रात भाजपा सरकार स्थापन झाले होते. परंतु ते टिकू शकले नाही. संविधान दिनाच्या मुहूर्तावर संविधानाचाच विजय झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य प्रगती करेल, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.
भाजपचा अहंकार संपला
सत्तास्थापनेच्या मोहात भाजपचा फज्जा झाला असून त्यांच्या नेत्यांचा अहंकार आज संपुष्टात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी हिताला प्राधान्य देईल. पुढील काळात राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच राहतील, असे प्रतिपादन प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी केले.
‘सोशल मीडिया’वर एकमेकांचे अभिनंदन
महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे अधिकृत कुठलाही एकत्रित जल्लोष आयोजित करण्यात आला नाही. मात्र ‘सोशल मीडिया’वर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांचे अभिनंदन करत होते. विविध आशयाचे ‘पोस्ट’ तसेच ‘मिम्स’देखील ‘शेअर’ करण्यात येत होते.