Maharashtra Government : मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:16 AM2019-11-28T00:16:58+5:302019-11-28T00:18:54+5:30
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता शहर व ग्रामीण असा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
नागपूर शहरात काँग्रेसचे माजी मंत्रीनितीन राऊत, आ. विकास ठाकरे, ग्रामीणमध्ये आ. सुनील केदार व आ. राजू पारवे तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्रीअनिल देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी पक्की मानली जात आहे.नुकतेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्याचा पीक पाहणी दौरा केला. यादौऱ्यात देशमुख यांनी पवार यांचे सारथ्य केले होते. देशमुख यांच्या घरीही भेट दिली होती. संत्रा उत्पादकांशी संवाद साधला होता. त्यावेळी देशमुख ज्या पद्धतीने पवारांसोबत फिरत होते, त्यावरून त्यांचा नंबर पक्का मानला जात आहे. १९९५ ते २०१४ या काळात देशमुख मंत्री होते. गेल्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपद भूषविले होते.
काँग्रेसच्या कोट्यात मंत्रिपदासाठी काहिशी रस्सीखेच होऊ शकते. आ. नितीन राऊत हे ज्येष्ठ सदस्य आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. विदर्भातील मागासवर्गीय नेता म्हणून त्यांच्या नावाला झुकते माप दिले जाऊ शकते. राऊत हे आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी व जलसंवर्धन मंत्री होेते. ज्येष्ठतेमुळे आ. सुनील केदार यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व उमरेडचे आमदार राजू पारवे हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत. मात्र, काँग्रेस नेत्यांशी असलेले निष्ठेचे संबंध पाहता ठाकरे यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आ. आशिष जयस्वाल हे मुळातच शिवसैनिक आहेत. युतीमध्ये रामटेकची जागा भाजपला सुटल्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले व विजयी झाले. विजयी होताच त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला समर्थन जाहीर केले. युती सरकारमध्ये त्यांना खनिकर्म महामंडळ देण्यात आले होते. नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा घट्ट रोवण्यासाठी जयस्वाल यांना संधी मिळणे निश्चित मानले जात आहे. तीन प्रमुख पक्ष व मित्रपक्षांचे हे सरकार असल्यामुळे वाटाघाटीत कमी मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच होत असून यात कोण बाजी मारतो हे गुरुवारी शपथविधीनंतर स्पष्ट होईल.