‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार रंगणार नागपुरात
By admin | Published: January 4, 2016 05:18 AM2016-01-04T05:18:08+5:302016-01-04T05:18:08+5:30
५९ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नागपुरात ७ ते १० जानेवारी या कालावधीत रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर
७ जानेवारीपासून आयोजन : राज्यातील ९०० मल्लांचा सहभाग
नागपूर : ५९ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नागपुरात ७ ते १० जानेवारी या कालावधीत रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तसेच नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने महालातील चिटणीस पार्कवर माती तसेच गादी विभागात कुस्त्या होतील. राज्यातील सर्व जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण विभागातील ४४ संघांचे ९०० मल्ल स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.
२८ वर्षानंतर नागपूरला या आयोजनाचा मान मिळाल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले,‘सर्व मल्लांची निवास आणि भोजन व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात येत आहे. चार दिवस सकाळ आणि सायंकालीन सत्रात गादीच्या दोन व मातीच्या एका आखाड्यात कुस्त्या खेळविण्यासाठी १२५ पंच आणि तांत्रिक अधिकारी राहतील. ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ या वजन गटात गादी आणि माती प्रकारात मल्ल झुंज देतील. ८६ ते १२५ किलो वजन प्रकारात माती विभागाचा विजेता तसेच गादी विभागाचा विजेत्या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीपदाची कुस्ती १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. विजेत्या मल्लाला महाराष्ट्र केसरीपदाची स्व. मामासाहेब मोहोळ स्मृती चांदीची गदा तसेच रोख एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. उपविजेत्या मल्लाला ५१ हजाराचा पुरस्कार मिळेल. अन्य वजन प्रकारात दररोज एका गटाचा विजेता घोषित होणार आहे. विजेत्या पहिल्या तीन मल्लांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक दिले जाईल. ६ जानेवारीला आगमनानंतर मल्लांचे वजन घेण्यात येईल. ७ ला सकाळी ८ वाजेपासून कुस्त्यांना सुरुवात होईल. दुपारी २ वाजेपासून मल्लांची मिरवणूक निघेल.’
या स्पर्धेचे उद्घाटन ७ ला सायंकाळी ४.३० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे करतील. समारोप व पुरस्कार वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत १० जानेवारीला सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
सर्व मल्ल आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजन समितीच्यावतीने दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी सादर केली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी खा. रामदास तडस, महापौर प्रवीण दटके, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे तसेच जिल्हा कुस्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)
नामवंत मल्लांचा सहभाग
४महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. त्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी, पुण्याचा सचिन यंगलवार यांच्यासह गणेश कायंदे(पुणे जिल्हा), चंद्रहार पाटील (सांगली), महेश मोहोड(पुणे), कौस्तुभ जाफळे(कोल्हापूर), राहुल कद्रेकर(पुणे जिल्हा), अतुल पाटील(अहमदनगर), योगेश पाटील(अहमदनगर),यांचा समावेश आहे. स्थानिक मल्ल उस्मानखान पठाण, रामचंद्र यंगळ आणि नीलेश राऊत हेदेखील जेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
व्यायाम शाळांना १४ लाखाचे अनुदान : पालकमंत्री
४नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात जुन्या व्यायाम शाळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि नव्या व्यायामशाळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपये अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
४महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची माहिती देताना पालकमंत्र्यांना व्यायाम शाळा संस्कृती टिकविण्यासाठी काय योजना आहे, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले,‘ व्यायाम संस्कृती आणि कुस्तीची परंपरा जीवित राहावी यासाठी जिल्हा विकास निधीतून सहकार्य करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून व्यायामशाळा बांधकामासाठी प्रत्येकी सात लाख आणि साहित्य खरेदीसाठी सात लाख असे अनुदान देण्यात येत आहे. वर्षभरात ४० व्यायामशाळांना हा लाभ देण्यात आला.’ पाच वर्षांत ३०० व्यायामशाळांना या योजनेचा लाभ देण्याची योजना असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी सांगितले.