महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:23 PM2019-03-12T22:23:17+5:302019-03-12T22:28:29+5:30
१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण यांचा सांस्कृतिक विचार आणि आजची स्थिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून भावे बोलत होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या यशवंतरावांनी राज्याची राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण केली. गृहमंत्री म्हणून देशाचेही नेतृत्व केले. राजकारणात त्यांचे कर्तृत्व मोठे आहे तसे साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातही आहे. संस्कारी, सांस्कृतिक, विचारवंत, वाचक, साहित्यिक, संगीत प्रेमी अशा सर्व अंगाने त्यांची ओळख करणे महत्त्वाचे आहे. राज्यकर्त्यांच्या दोन डोळ्यांपैकी एक संस्कृतीचा असावा, असे मानणारे ते होते. त्यांनी कृष्णाकाठ, युगांत अशा पुस्तकातून दर्जेदार साहित्य रचले. त्यांनीच साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली व एवढेच नाही तर लक्ष्मण जोशी, ना.धो. महानोर, ग.दि. माडगूळकर अशा अनेक दिग्गजांना महत्त्वाच्या पदावर विराजमानही केले. माणस शोधून त्यांना आवश्यक ठिकाणी नियुक्त करून महाराष्ट्र समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. असा सांस्कृतिक डोळा आजच्या राज्यकर्त्यांना नाही, असे परखड मत भावे यांनी मांडले.
डोक्यावरून मैला वाहुन नेण्यास बंदी घालण्याचे विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. यातूनच त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून येतो. तमाशा कलावंत, कुस्तीगिर, साहित्यिक आदींना मानधन देण्याची सुरुवात त्यांनी केली. मुंबईत साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था केली. त्यांच्या तोडीचा एकही राजकारणी आज मिळणे शक्य नाही. त्यांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा राज्यकर्त्यांना जपता आला नाही, याची खंत भावे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद मुनघाटे, अनिल इंदाणे, प्रेमबाबू लुनावत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रदीप विटाळकर व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. कवी लोकनाथ यशवंत यांनी आभार मानले.