महाराष्ट्र हळहळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:54+5:302021-01-10T04:06:54+5:30
भंडारा जिल्हा रुग्णालयात दहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू मध्यरात्री घडली हृदय पिळवटून टाकणारी घटना : सात शिशूंना सुरक्षित स्थळी ...
भंडारा जिल्हा रुग्णालयात दहा
नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू
मध्यरात्री घडली हृदय पिळवटून टाकणारी घटना : सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वॉर्डात लागलेल्या भीषण आगीत १० नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. १७ नवजात शिशुपैकी ७ शिशूंना वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूने तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून तात्काळ चाैकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वाॅर्डात (एसएनसीयू) मध्यरात्री उशिरा आग लागली. त्यात दहा नवजात शिशू होरपळून मृत पावले. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलीस पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरु नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीत मृत पावलेल्या शिशूंमध्ये हिरकन्या हिरालाल भानारकर, रा. उसगाव (साकोली), प्रियंका जयंत बसेशंकर, रा. जांब (मोहाडी), योगिता विकेश धुळसे, रा. श्रीनगर पहेला (भंडारा), सुषमा पंढरी भंडारी, रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया), गीता विश्वनाथ बेहरे, रा. भोजापूर, दुर्गा विशाल रहांगडाले, रा. टाकला, सुकेशनी धर्मपाल आगरे, रा. उसरला (मोहाडी), कविता बारेलाल कुंभारे, रा. सितेसारा आलेसूर (तुमसर), वंदना मोहन सिडाम, रा. रावणवाडी (भंडारा) व एका अज्ञात मातेच्या शिशूचा समावेश आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एक जुळे आहे. उर्वरित शामकला शेंडे (बालक-स्त्री), दीक्षा दिनेश खंडाते, अंजना युवराज भोंडे, चेतना चाचेरे, करिश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री), सोनू मनोज मारबते यांच्या शिशूंचा समावेश आहे.
तात्काळ चाैकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरेच बंद
नवजात शिशुच्या कक्षावर नजर ठेवण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या कक्षाबाहेर आणि प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र यापैकी बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासन अद्यापही सजग नसल्याचे चित्र आहे.
अग्निरोधक सिलिंडर बेपत्ता
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून किमान अग्निरोधक सिलिंडर असणे क्रमप्राप्त आहे. पण आवश्यक ठिकाणी अग्निरोधक सिलिंडरच नसल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडर बेपत्ता तर झाले नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.