Maharashtra Winter Session 2022: आधी आभार, मग टोले; अनिल परबांनी विचारले, भाजपच्या तिकिटावर लढणार का?, एकनाथ शिंदे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:15 PM2022-12-28T18:15:43+5:302022-12-28T18:17:36+5:30
काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राविरोधात ठराव संमत केला.
काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राविरोधात ठराव संमत केला. या ठरावाविरोधात महाराष्ट्र सरकारनेही काल कर्नाटक विरोधात ठराव संमत केला, यानंतर आज विधान परिषदेत सरकारचे आभार मानले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि शिंदे गटावर टोलेही लगावले.
'मा. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या ठरावाचे आणि तो संमत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सीमावासीयांना दिलेल्या सवलतींबद्दलही आम्ही आभार मानतो, मुख्यमंत्र्यांनी आमच्या शंकांचे निरसन केले, याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मनातो, असं आमदार अनिल परब म्हणाले.
'पण हा ठराव मांडताना त्यांनी राजकीय टोले लगावले, हा राजकीय विषय नव्हता. त्यांनी जी काही कामगिरी केली आहे, त्यांची ३३ देशांनी दखल घेतली आहे. ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत, आम्हीही बाळासाहेबांचे सैनिक आहोत, तुम्ही ४० आमदार घेऊन गेलात. सरकार स्थापन केलेत. जात असताना म्हणालात, या चाळीस आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, एका आमदाराचा पराभव झाला तर मी राजीनामा देईन, असं तुम्ही म्हणालात. फक्त बाळासाहेबांच्या पायावर हात ठेऊन सांगा, पुढच्या वेळी भाजपच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही?, असा सवाल आमदार अनिल परब यांनी यावेळी केला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
'यांच्यातील किती लोक भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. हे आम्हाला भाजपच्या माध्यमातून हरवायला येणार याच आम्हाला दु:ख वाटणार, असंही आमदार अनिल परब म्हणाले.
यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण चिंता करु नका. तुम्ही निवडून आलात तेव्हा भाजपचीच मदत तुम्हाला लागली होती. ज्या दिवशी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तुम्ही गेलात त्या दिवशीपासून तुम्हाला बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार नाही, तो अधिकार फक्त आम्हाला आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.