Maharashtra Winter Session 2022 : सीमाप्रश्नावरून अधिवेशन तापले, विधिमंडळात विरोधक आक्रमक; सरकारकडून कर्नाटकचा निषेध  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:59 AM2022-12-20T05:59:25+5:302022-12-20T06:00:15+5:30

विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद

maharashtra winter Session 2022 heated up over karnataka border issue opposition aggressive in legislature | Maharashtra Winter Session 2022 : सीमाप्रश्नावरून अधिवेशन तापले, विधिमंडळात विरोधक आक्रमक; सरकारकडून कर्नाटकचा निषेध  

Maharashtra Winter Session 2022 : सीमाप्रश्नावरून अधिवेशन तापले, विधिमंडळात विरोधक आक्रमक; सरकारकडून कर्नाटकचा निषेध  

Next

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जोरदार पडसाद उमटले.  विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सरकारने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या फेक ट्विटचा मुद्दा काढून विरोधकांचे हल्ले परतवून लावले. 

महाराष्ट्रातील एका खासदाराला कर्नाटकमध्ये येण्यापासून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेचे कामकाज सुरू होताच मांडला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या फेक ट्विटमागे कोणता पक्ष आहे याची माहिती मिळाली आहे. ती माहिती लवकरच समोर आणू. सीमावासीयांच्या मागे सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे.

बेळगावात महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव व मराठी भाषिकांनी केलेल्या आंदोलनाला दडपण्याच्या प्रकाराचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठी भाषकांना संविधानानुसार आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. दडपशाहीचे धोरण निषेधार्ह असून, कर्नाटकने लोकशाहीच्या तत्त्वांचे पालन करावे. दरम्यान, सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन ‘कर्नाटक सरकार हाय हाय’, ‘विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

कर्नाटक पोलिसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लाठीमार
कागल (जि. कोल्हापूर) : बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी कोगनोळी टोलनाक्याजवळील दूधगंगा नदीपुलावर रोखले. कर्नाटक पोलिसांनी बॅरिकेट्सजवळ आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यावर सौम्य लाठीमार केला. यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत मुश्रीफ व इतरांना ताब्यात घेत पोलिस गाडीत बसवत काही वेळानंतर सोडून दिले. 

महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनास विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने टिळकवाडी येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास उपस्थित राहण्यास महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव करण्याबरोबरच ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करून १४४ कलम लागू करीत समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली.

जयंत पाटलांचा टाेला
ते ट्विट बनावट होते, असे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क... आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी या बाबत नक्की काय तो निकाल द्या, असे उपरोधिक ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

‘बोम्मईंचे ते ट्विटर हँडल बोगस कसे?’ 

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेले वादग्रस्त ट्विट हे बनावट हँडलवरून करण्यात आले होते, असा दावा केला जात आहे. पण बोम्मई यांचे ते ट्विटर हँडल जानेवारी २०१५ पासून व्हेरिफाइड आहे. त्यावर कर्नाटकच्या शासकीय निर्णयांची माहिती दिली जात आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. 
  • यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात दिले होते. त्याच्या अनुषंगाने चव्हाण म्हणाले की, बोम्मईंच्या ट्विटची भाषा आक्षेपार्ह होती. त्यावर प्रक्षोभ उडाल्यानंतर ते हँडलच बनावट असल्याचा खुलासा करण्यात आला. 
  • आता त्याप्रकरणी एका व्यक्तीला पकडले म्हणता तर ती कोण आहे हेही जगासमोर येऊ द्या. राज्यातील सरकारने नरमाईची आणि बोटचेपी भूमिका का घेतली आहे? अशीही विचारणा त्यांनी केली.

Web Title: maharashtra winter Session 2022 heated up over karnataka border issue opposition aggressive in legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.