अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:56 AM2022-12-31T05:56:58+5:302022-12-31T05:57:28+5:30
या प्रस्तावासंदर्भात मला काही माहिती नाही, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात दिलेल्या अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीच सही नसल्याने महाविकास आघाडीत काय चालले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात गुरुवारी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे अविश्वास ठराव दिला आहे. या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षाच्या ४७ आमदारांच्या सह्या आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीच सही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सही केली नसल्याचे सांगितले जात आहे. या ठरावावर राष्ट्रवादी, काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांच्या सह्या आहेत.
यांच्या आहेत सह्या
ठरावावर नाना पटोले, अजय चौधरी, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, आमदार वर्षा गायकवाड, आमदार प्रतिभा धानोरकर, विक्रमसिंह सावंत, संजय जगताप, संग्राम थोपटे, नितीन देशमुख, यशवंत माने, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे यांच्या सह्या आहेत.
मला काही माहीत नाही : अजित पवार
या प्रस्तावासंदर्भात मला काही माहिती नाही, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या नरमाईच्या भूमिकेची चर्चा सुरू असल्याने याबाबतही अजित पवारांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील पक्षच शंका उपस्थित करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"