Maharashtra Winter Session 2022 : विधानभवनातील शिवसेना कार्यालय कोणाला? पवार-दानवे भडकले, मुख्यमंत्र्यांचा संयम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:03 AM2022-12-19T06:03:38+5:302022-12-19T06:04:05+5:30
शिवसेनेचे कार्यालय कोणाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला की उद्धव ठाकरे यांच्या गटाला यावरून विधानभवनात वातावरण चांगलेच तापले.
नागपूर : नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना शिवसेनेचे कार्यालय कोणाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला की उद्धव ठाकरे यांच्या गटाला यावरून विधानभवनात वातावरण चांगलेच तापले. अखेर उद्धव ठाकरे गटाला हे कार्यालय घेतले.
राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता. ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळविला होता. नागपुरातही हाच प्रकार घडला. आपल्या आमदारांना बसण्यासाठी माझे कार्यालय आहे. आपल्या मंत्र्यांची देखील कार्यालय आहेत. त्यामुळे संघर्ष कशाला अशी समजूतदारपणाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अधिवेशनात घेतली होती आणि वाद टाळला होता. तीच भूमिका यावेळी देखील ते घेतील, असे म्हटले जात आहे.
नागपूर विधानमंडळ विधान भवन परिसरात असलेले शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला दिले जात आहे आणि तसा लेखी आदेशही येत असल्याची कुणकुण लागताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नागपूरच्या विधानभवनात पोहोचले. तेथे त्यांनी विधान मंडळ सचिव राजेंद्र भागवत आमच्याकडे विचारणा केली तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील ते भेटले.
विधान मंडळाच्या रेकॉर्डनुसार आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मग शिंदे गटाला कार्यालय कोणत्या अधिकारात दिले जात आहे असा सवाल दानवे यांनी केला. दुसऱ्या गटाला कुठे कार्यालय द्यायचे की नाही द्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवा पण आमच्या कार्यालयाला धक्का लावू नका, असे ते म्हणाले.
आमदार, शिवसैनिक कोणासोबत हे महत्त्वाचे
शिंदे गटाचे एक मंत्री ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आमचे नेते मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या अधिवेशनातही या विषयावर संघर्षाची भूमिका घेतलेली नव्हती. उद्धव ठाकरे गटाला कार्यालय देण्यात आले होते, त्यावेळी देखील आम्ही विरोध केलेला नव्हता. शेवटी कार्यालय कोणाचे यापेक्षा बहुसंख्य आमदार, शिवसैनिक, पदाधिकारी कोणासोबत हे महत्त्वाचे आहे, असा टोला देखील या मंत्र्यांनी हाणला.
त्यांना हवे तर महाल द्या....
- दानवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, १९९० पासून विधानभवन परिसरात शिवसेनेला जे कार्यालय दिले जाते तेच यावेळीही दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
- या कार्यालयात आमचे कर्मचारी आजपासूनच रूजू झाले आहेत. कामकाज सुरू केले आहे. हे कार्यालय आमच्याकडेच राहील. शिंदे गटाला मोठे कार्यालय द्या, वाटल्यास महाल द्या पण आम्ही हे कार्यालय सोडणार नाही, असेही त्यांनी बजावले.