Maharashtra Winter Session 2022 : एकही राज्यमंत्री नाही, तरी बंगल्यांवर उधळपट्टी का?, सुनील प्रभू यांचा विधानसभेत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 07:02 AM2022-12-20T07:02:03+5:302022-12-20T07:06:53+5:30
सोमवारी विधानसभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना राज्यमंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी का केली गेली, असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सोमवारी विधानसभेत सरकारला विचारला. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरला होता, हे विशेष. सोमवारी विधानसभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले, सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना त्यांच्यासाठी असलेले बंगले सजवले आहेत. एकीकडे सरकार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढते आहे, तर दुसरीकडे अशाप्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे सरकारने यावर त्वरित खुलासा करावा. तसेच सुयोग इमारतीत आतापर्यंत पत्रकारांचीच राहण्याची व्यवस्था केली जात होती. यंदा या इमारतीला दोन भागात विभागण्यात आले. यात एका भागात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या स्टाफला जागा देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - Winter Session 2022 : मंत्रिमंडळात २० मंत्री, मात्र तयार होताहेत ४२ बंगले
मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही...
या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार, याची सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठे माहिती असते. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधीही करू शकतो. या अधिवेशनातही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तशी तयारी केली असावी, असे स्पष्ट केले.
फडणवीसांची प्रभूंना ऑफर
यादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत सुनील प्रभू यांना मंत्रिपदाची ऑफरसुद्धा देऊन टाकली. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो, असे म्हणताच प्रभू यांनी कधी करता? असा प्रश्न केला. तेव्हा फडणवीस यांनी चिमटा काढला. तुम्हाला संधी हवी आहे का? असे म्हणत मंत्रिपदाची ऑफर दिली. तसेच हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचेही स्पष्ट केले.