Maharashtra Winter Session 2022: एकाचवेळी दोन कर्तव्य! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार आई विधानभवनात पोहचल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:57 AM2022-12-19T11:57:13+5:302022-12-19T12:20:41+5:30
कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे असं आमदार सरोज अहिरे वाघ म्हणाल्या.
मंगेश व्यवहारे
नागपूर - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
या बाळाचं नाव प्रवीण वाघ असे आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधीक सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.