Maharashtra Winter Session:...अन् राज ठाकरे विधानभवनात पोहचले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 02:14 PM2022-12-23T14:14:55+5:302022-12-23T14:20:35+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर - राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर इथं सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत असल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यावर विधानसभेत निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ पायऱ्यांवर धरणं आंदोलन केले. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी राज यांनी विधान भवनात येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहचले. राज ठाकरे विधानभवनात पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जात राज ठाकरेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट #RajThackeray#EknathShindepic.twitter.com/qR42xLDVOv
— Lokmat (@lokmat) December 23, 2022
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंशी फारकत घेत बाळासाहेबांची शिवसेना हा नवा पक्ष काढला. त्यानंतर शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. त्यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंडखोरीनंतर पहिली भेट झाली होती. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा निघाला. त्यानंतर पुन्हा राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले. दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्या मनसेने आयोजित केलेल्या दिपोत्सव कार्यक्रमाचं उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यात आता पुन्हा राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
लक्षात ठेवा, मनसेचंच पोट्टं वरवंटा फिरवणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपल्या हस्ते नियुक्तीपत्र दिली. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात मनसेचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. "नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज भाजपाचा आहे आणि कालांतराने हेही चित्र बदलेल. जे आपल्यावर हसताहेत त्यांनी हसावं. हे पोट्टं काय करणार असंही तुम्हाला काही लोक बोलत असतील तर बोलू द्यावं. पण मी विश्वास देतो की एकदिवशी हेच पोट्टं त्यांच्यावर वरवंटा फिरवणार" असं राज ठाकरे म्हणाले.