देशात जैवविविधतेची पहिली जीन बँक महाराष्ट्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:34 PM2022-01-04T19:34:28+5:302022-01-04T19:36:21+5:30
Nagpur News महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने ५ वर्षांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील जैवविविधतेची ‘जीन बँक’ तयार केली आहे. अशाप्रकारे जीन बँक बनविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.
नागपूर : आपल्या राज्याच्या भूमीत, जंगलात, पाण्यात काेणत्या प्रजातीचे किती प्राणी आहेत, त्यांचे वास्तव्य, अस्तित्व, त्यांचा उपयाेग, किती प्रजाती धाेकादायक स्थितीत आहेत, याची इत्थंभूत माहिती आता उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने ५ वर्षांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील जैवविविधतेची ‘जीन बँक’ तयार केली आहे. अशाप्रकारे जीन बँक बनविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.
मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शेषराव पाटील व सदस्य सचिव प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था यांच्या समन्वयातून डाॅ. अनिल काकाेडकर यांच्या प्रयत्नातून हा ७८० पानी दस्तावेज तयार करण्यात आला आहे. एनसीसीआर, सीएसआयआर अशा पाच तांत्रिक संस्थांच्या सहकार्याने जवळपास ६० सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यातील २६ जिल्ह्यात सर्वेक्षण करून ही जीन बँक तयार करण्यात आली आहे.
जैवविविधतेच्या या जीन बँकमध्ये सागरी घटक, गाेड्या पाण्यातील घटक, गवताळ प्रदेशातील घटक, वनक्षेत्र, वन व्यतिरिक्त क्षेत्रातील घटक, कृषी पिके तसेच वनक्षेत्राबाहेरील प्राणी घटकांचा समावेश आहे. सूक्ष्म जीवांपासून, माेठे जीव, औषध वनस्पती अशा सर्व प्रकारच्या सजीव घटकांचा डाटा या जीन बँकेत गाेळा करण्यात आला आहे. हा डाटा अभ्यास व जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास डाॅ. शेषराव पाटील यांनी व्यक्त केला.
मागील वर्षी ४ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर दाेन बैठका झाल्या. अहवालाला तत्वत: मान्यता मिळाली असून, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. या जीन बँकेची व त्यानुसार प्रकल्प तयार करण्याची जबाबदारी जैवविविधता मंडळाकडे देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य स्तरावरील नियंत्रण समितीसह विभागीय, जिल्हा स्तरावर व गावस्तरावर समिती स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाच्या कल्पना टेमगिरे यांनी दिली. मंडळातर्फे जैवविविधता संवर्धनाचा राेडमॅप तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात २८ हजार समित्या
२ जानेवारी २०१२ साली स्थापन महाराष्ट्र जैवविविधता मंडळाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अंतर्गत जैवविविधतेचे सर्वेक्षण, संवर्धनाच्या दृष्टिने राज्य, विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर २८,६५० जैवविविधता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जैवविविधता उत्पादनाचा उपयाेग करणाऱ्या हजारावरील कंपन्यांपैकी १९७ कंपन्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. मंडळाचे काम प्राथमिक टप्प्यावर आहे व पुढे बरेच काम करायचे असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले.