महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांची ‘रक्ताक्षरी’

By Admin | Published: April 28, 2017 03:03 AM2017-04-28T03:03:37+5:302017-04-28T03:03:37+5:30

वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी यासाठी विदर्भवाद्यांनी गेल्या काही काळापासून कंबर कसली आहे.

Maharashtra's Vidarbha's 'Raktakshari' | महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांची ‘रक्ताक्षरी’

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांची ‘रक्ताक्षरी’

googlenewsNext

रक्ताने पत्र लिहून वेधणार पंतप्रधानांचे लक्ष : ५२ तालुक्यांत फडकणार विदर्भाचा झेंडा
योगेश पांडे नागपूर
वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी यासाठी विदर्भवाद्यांनी गेल्या काही काळापासून कंबर कसली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील १ मे रोजी महाराष्ट्रदिनी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे. सोबतच पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवाद्यांतर्फे ‘रक्ताक्षरी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. भाजपाने वेगळ््या विदर्भाबाबत केलेल्या ठरावाची आठवण करून देण्यासाठी या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पाठविण्यात येणार आहे.
दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. यंदादेखील प्रशासनाकडून त्याची तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. मागील वर्षी या मुद्यावरून राजकारण बरेच तापले होते. काळ््या दिवसाची ही परंपरा पुढे ठेवत यंदादेखील १ मे रोजी सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडादेखील फडकविण्यात येणार आहे. मागील वर्षी ३० तालुक्यांमध्ये झेंडावंदन झाले होते. यंदा या संख्येत वाढ होणार असून ५२ तालुक्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपुरात विदर्भ राज्य आघाडीतर्फे ‘रक्ताक्षरी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या रक्तांकित स्वाक्षरीचे पत्र पाठविण्यात येणार आहे. या निवेदनाला विदर्भवाद्यांच्या रक्ताने केलेल्या स्वाक्षऱ्या जोडण्यात येणार आहे. वेगळ््या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यासंदर्भातील भाजपाच्या प्रस्तावाची आठवण या मोहिमेच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे. याच दिवशी ‘विदर्भ कनेक्ट’तर्फे सकाळच्या सुमारास काळा झेंडा फडकविण्यात येणार आहे.
यात विविध विदर्भवादी संघटना सहभागी होतील. यासंदर्भात विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.रवी संन्याल यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला. १ मे रोजी आघाडीच्या कार्यालयात ‘रक्ताक्षरी’ मोहीम राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकाचौकात लावणार झेंडे
१ मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गावांमधील घराघरांवर, चौकात, वेशीवर विदर्भाचे झेंडे लावण्यात येणार आहेत. शिवाय विविध ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ विविध उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी जनतेत जाऊन मार्गदर्शन करतील व आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडतील.
कशी जुळणार जनता?
विदर्भाची चळवळ जनसामान्यांपर्यंत नेण्याची आवश्यकता असताना १ मे संदर्भात प्रचार-प्रसार दिसून आलेला नाही. अद्यापपर्यंत संघटनांतर्फे वातावरणनिर्मिती करण्यात आलेली नाही. अगदी विदर्भवाद्यांनी आतापर्यंत प्रभावीपणे वापरलेल्या ‘सोशल मीडिया’त देखील फारसा प्रचार-प्रसार झालेला नाही. अशा स्थितीत जनता आंदोलन व उपक्रमांशी कशी जुळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात ‘विरा’चे संस्थापक अ‍ॅड.श्रीहरी अणे यांना विचारणा केली असता त्यांनी नागरिकांना जोडण्यासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मात्र तळागाळात विदर्भवाद्यांचे समाधानकारक काम सुरू असून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Maharashtra's Vidarbha's 'Raktakshari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.