“महाराष्ट्रवादी चले जाओ”चा विदर्भवाद्यांनी दिला नारा
By दयानंद पाईकराव | Published: May 2, 2024 04:52 PM2024-05-02T16:52:46+5:302024-05-02T16:56:00+5:30
व्हेरायटी चौकात आंदोलन : काळ्या पट्ट्या बांधून केला महाराष्ट्र दिनाचा निषेध
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा, महाराष्ट्रवादी चले जाओ अशी नारेबाजी करीत व्हेरायटी चौकात विदर्भवाद्यांनी रास्ता रोको करून महाराष्ट्र दिनाचा निषेध करीत वेगळ्या विदर्भाची मागणी रेटून धरली.
महाराष्ट्र दिनानिमित्त विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काळा दिवस पाळून व्हेरायटी चौकात निषेध आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनात समितीचे पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे यांनी विदर्भात सिंचन प्रकल्प न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून कारखाने नसल्याने बेरोजगार युवक इतर शहरांमध्ये रोजगारासाठी जात असल्याचे सांगितले. सोबतच वाढते प्रदुषण, कुपोषण, वीजेचे वाढलेले दर, नक्षलवाद यामुळे जनतेच्या भावना तीव्र झाल्या असून त्वरीत विदर्भ राज्याची निर्मिती करावी, या मागण्या केल्या. आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी विदर्भवाद्यांनी जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका केली.
आंदोलनात विष्णू आष्टीकर, सुधा पावडे, ज्योती खांडेकर, राजेंद्र सतई, अमूल साकुरे, प्यारुभाई उर्फ नौशाद हुसैन, राहुल बनसोड, रजनी शुक्ला, उषा फुलझेले, वासुदेव मासुरकर, हरिभाऊ पाणबुडे, ईश्वर चौधरी, फइम अन्सारी, जहागीर पठाण, गुलाबराव धांडे, श्रीकांत दौलतकर आणि विदर्भवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.