यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 10:47 AM2022-12-08T10:47:19+5:302022-12-08T10:48:55+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना १०० एकर जागा शोधण्याची सूचना
नागपूर : यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. येथे राज्यातील १ लाख ९२ हजार सरपंच तसेच ग्रामविकासात काम करणारे अधिकारी- कर्मचारी अशा सुमारे ३ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याची सोय राहील. हे केंद्र उभारण्यासाठी नागपूर परिसरात १०० एकर जागेचा शोध घेण्याच्या सूचना नागपूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार म्हणाले, येथे प्रत्यक्ष व स्क्रीनद्वारेही प्रशिक्षणाची सोय असेल. प्रशिक्षणार्थीच्या निवासासाठी आमदार निवास येथील व्यवस्था अपग्रेड केली जाईल. ग्राम विकास खात्याची ही योजना असून, सांस्कृतिक विभाग नोडल एजंसी म्हणून हा प्रकल्प साकारेल. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच चंद्रपूर येथे एसएनडीटीचे स्कील डेव्हलपमेंटचे उपकेंद्र उभारण्यासाठी ५५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा
- गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाला कायदा करावा लागेल. येत्या हिवाळी अधिवेशनात किंवा मार्चच्या अधिवेशनात संबंधित कायदा मंजूर केला जाईल. ट्रायबल दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठाला केंद्र सरकारच्या आदिवासी खात्याचा निधी तसेच आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
आशा भोसले यांना नागपुरात देणार ‘महाराष्ट्र भूषण’
- प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात २१ डिसेंबर रोजी प्रदान करण्याची तयारी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने चालविली आहे. यानिमित्त यशवंत स्डेडियम येथे दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून येथेच हा सोहळा पार पडेल, असे नियोजन सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.