महाशिवरात्रीचा महानिशिथकाल मध्यरात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:28 PM2018-02-09T23:28:47+5:302018-02-09T23:31:13+5:30
मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून, त्या दिवशी महानिशिथकाल उत्तररात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत म्हणजे ४८ मिनिटे आहे. यावेळी श्री साबसदाशिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे म्हणजे महापुण्य मिळते, असे पुराणात सांगितल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून, त्या दिवशी महानिशिथकाल उत्तररात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत म्हणजे ४८ मिनिटे आहे. यावेळी श्री साबसदाशिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे म्हणजे महापुण्य मिळते, असे पुराणात सांगितल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
पुराणग्रंथात महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना नमूद केले आहे की, या दिवशी सायंकाळनंतर प्रत्येक प्रहराला शिवपूजन केल्यास त्या व्यक्तीला मोक्षप्राप्त होतो. या दिवशी रात्रीचा प्रथम प्रहर सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. यावेळी श्री शिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे. दुसरा प्रहर रात्री ९.२६ वाजता सुरू होईल. यावेळी श्री शंकराय नम: या मंत्रोच्चाराने पूजन करावे. तिसरा प्रहर मध्यरात्री १२.३६ वाजता राहील त्यावेळी श्री महेश्वराय नम: आणि चवथा प्रहर पहाटे ३.४५ वाजता सुरू होईल, यावेळी श्री रुद्राय नम: या मंत्रोच्चाराने शिवपूजन करावे. प्रत्येक प्रहरात शिवपूजन करताना शिवाला कमळ, पांढरी फुले, बेलाची पाने वाहावीत, त्याआधी कच्च्या दुधाने अभिषेक करावा, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
शिवोपासना शनिसोडतीवर रामबाण उपाय आहे. सध्या शनि धनु राशीतून भ्रमण करत आहे. त्यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साडेसाती तर वृषभ व कन्या राशीला छोटी साडेसाती म्हणजे अढ्या चालू आहे. या राशीच्या व्यक्तींनी जरूर महाशिवरात्रीला उपवास करून शास्त्रोक्त पद्धतीने शिवपूजन करावे, असा डॉ. वैद्य यांचा सल्ला आहे.
ज्यांना विविध कारणांमुळे शिवरात्रीचा उपवास करणे शक्य नसेल त्यांनी श्री शिवमहिमा स्त्रोत, श्री शिवलिलामृतचा कमीत कमी एक अध्याय तज्ज्ञ ज्योतिष्यांच्या सल्ल्याने वाचावा. शिवलिलामृताच्या प्रत्येक अध्याय वाचनामुळे वेगळी फलश्रुती प्राप्त होते. या दिवशी महामृत्यूंजय जप किमान १०८ वेळा करावा. तसेच २१, ५१, १०८ वेळेस ‘ओम नम: शिवाय’ हा जप करावा, त्यानी निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते, असे ज्योतिषाचार्य डॉ. वैद्य यांनी कळविले.