जिल्ह्यात उद्या ‘एक तास स्वच्छतेसाठी’ महाश्रमदान उपक्रम
By गणेश हुड | Published: September 30, 2023 03:43 PM2023-09-30T15:43:31+5:302023-09-30T15:46:23+5:30
विविध उपक्रमात दोन लाख नागरिकांचा सक्रिय सहभाग
नागपूर : १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला आवाहन केलेले आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये एकाच वेळी १ तास स्वच्छतेसाठी ह्या महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम "कचरामुक्त भारत" आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छता ही सेवा अभियांनातर्गत जिल्हयात श्रमदान, सफाई कर्मचारी व त्यांच्या परिवाराची आरोग्य तपासणी व गौरव, स्वच्छता रन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, ईत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहे. या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील ग्रामिण भागांमधून सुमारे २ लक्ष नागरिकांनी आपला सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे.
‘माझे गाव माझी स्वच्छता’ हे ब्रिद लक्षात घेऊन रविवारी सकाळी १० ते ११ या कालावधीत महाश्रमदान राबविण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये ग्रामस्थ स्वत: आपल्या गावाला स्वच्छ-सुंदर करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. लोकप्रतिनीधी, जिल्हा परिषद,पंचायत समिती पदाधिकारी, तसेच सदस्य हे ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी व ग्रामिण जिवनमान उचावण्यासाठी उत्स्फुर्त सहभाग घेणार आहेत. तर गावस्तरावरील सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामसेवक, तसेच महिला बचत गट, युवक-युवती मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, एन.सी.सी, चे विद्यार्थी व शालेय विद्यार्थी, तसेच सर्व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी हे सहभागी होणार आहेत.
महाश्रमदान कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र तसेच संस्थांनी व नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे. एक तास स्वच्छतेसाठी महाश्रमदान मोहिमेची सुरुवात गावाफेरीने होणार आहे. यात स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.