महात्मा गांधी जयंती विशेष:प्रेरणेचे प्रतीक नागपुरातील 'गांधी विहीर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:08 PM2019-10-01T22:08:43+5:302019-10-01T22:10:42+5:30
सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. विशेष म्हणजे, १२ दिवसाच्या श्रमदानातून ही विहीर उभी राहिली. कमला नेहरू यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली होती, असे सांगण्यात येते. 'गांधी विहीर' म्हणून आजही या विहिरीची वेगळी ओळख आहे.
कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधीनागपूरला आले होते. सफाई कामगारांना सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी सफाई कामगारांची वसाहत असलेल्या बोरकरनगरातच विहीर खोदण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळातील आठवणींना उजाळा देत बोरकरनगरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले, त्याकाळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव होता. सफाई कामगारांसाठी स्वतंत्र विहीर खोदण्यासाठी महात्मा गांधी यांनी निर्णय घेतल्याने लोकांमध्ये उत्साह होता. बोरकरनगरातच विहिरी खोदायची असल्याने ती वसाहतीच्या मधोमध असावी असा लोकांचा आग्रह होता. कामगारांनी दिवस-रात्र एक करून केवळ १२ दिवसात विहीर खोदून काढली. विहिरीचे लोकार्पण स्वत: महात्मा गांधी यांनी केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुनमचन्द राका व ज्येष्ठ नागरिक जंगलूजी बढेल यांनी या विहिरीच्या देखभालीची जबाबदारी हाती घेतली. ही विहीर बोरकरनगरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या नागरिकांसाठी जीवनदायी ठरली. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध सिनेकलावंत व काँग्रेसचे नेते दिवंगत सुनील दत्त यांनीही या विहिरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी परिसरातील लहान मुलांना विहिरीच्या पाण्याद्वारे अंघोळ घालून दिली होती, असेही नागरिक सांगतात.
'गांधी विहीर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विशेष विहिरीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, अशी मागणी महात्मा गांधी विचार मंचने केली आहे. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विहिरीच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन केले. परंतु देखभालीअभावी काही वर्षातच सर्वच नष्ट झाले. दरम्यान मनपातर्फे या विहिरीलगत गडर लाईन टाकण्याचे काम झाले. येथील नागरिकांनी याला विरोधही केला, परंतु अधिकाऱ्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. आज या विहिरीला गडरची घाण लागली आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बापूंच्या विहिरीची दुर्दशा झाली आहे.