राज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी होणार; महाज्योतीचे नियोजन
By आनंद डेकाटे | Published: March 16, 2023 05:11 PM2023-03-16T17:11:02+5:302023-03-16T17:13:32+5:30
प्रत्येक जिल्ह्यासाठी ३ लाख तर विभागाला मिळणार १० लाख रूपये
नागपूर : ११ एप्रिल हा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीदिन. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्याचा निर्णय महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेने केला आहे. यासाठी होणाऱ्या खर्चाने नियोजन सुद्धा करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला ३ लाख रूपये व विभयागाला १० लाख रूपये उपलब्ध करून दिले जातील.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमुल्य योगदान आहे.त्यामुळे त्यांची जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्याचा निर्णय महाज्योतीने घेतला. संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला.
या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मी सावित्रीबाई बालते किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा, र निबंध स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येतील.