महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे
By admin | Published: March 7, 2017 02:22 AM2017-03-07T02:22:49+5:302017-03-07T02:22:49+5:30
महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार ...
प्रल्हाद लुलेकर : विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमाला
नागपूर : महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार मांडले. स्त्रीशिक्षण, त्यांना समान अधिकार, शेतकऱ्यांची परिस्थिती व शासनव्यवस्था चालविताना घ्यावयाच्या धोरणात्मक गोष्टींचे विवेचन त्यांनी केले आहे. त्या काळात असलेले प्रश्न आजही या देशात आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यकाळातही नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि फुलेंच्या कार्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचे वर्तमानकाळात महत्त्व’ या विषयावर डॉ. लुलेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपला विषय मांडताना डॉ. लुलेकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची अनेक उदाहरणे दिली. मुलगी शिकली तर समाज नासेल, या भारतीय संस्कृतीत रुजलेल्या विचारांना त्यांनी आव्हान दिले व देशातील पहिली मुलींची शाळा काढली. १८५८ पर्यंत पुण्यात मुलींच्या ३५ शाळा त्यांनी सुरू केल्या. जाती, समाजाच्या वस्त्या लक्षात घेऊन फुले दाम्पत्याने अभ्यासक्रम तयार केला. ब्रिटिश शासनाला धोरणात्मक बाबी समजावून सांगितल्या. त्या काळातही नोकऱ्यांची कमतरता लक्षात घेता त्यांनी व्यापारिक शिक्षणावर भर दिला. समाजात खालच्या वर्गाचे होणारे शोषण थांबविण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर आराखडा सादर केला. जोतिबांनी कार्ल मार्क्सच्या आधी शोषणाचे सत्य मांडले. धर्माच्या मागे अर्थकारण असते हे विचार त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या स्थितीसाठी त्यांनी त्यावेळी दिलेली कारणे आणि सुचविलेले उपाय आजही कालप्रभावी असल्याचे मत डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केले.
स्त्री ही जन्मदात्री आहे म्हणून नाही तर कामाचा व्याप आणि बुद्धिमत्तेनेही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ठाम मत फुले यांचे होते. त्यामुळे तिला अर्धांगिनी म्हणून नाही तर माणूस म्हणून समाजात स्वीकारले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पुरोहितांशिवाय कमी खर्चात विवाह करण्याचे सूत्र त्यांनी सांगितले आणि आज विवाहावर कोट्यवधीचा खर्च केला जातो. कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञान, त्यांना विहिरी बांधण्यास प्रोत्साहन देण्याच्या धोरणात्मक गोष्टी त्यांनी सुचविल्या. या महापुरुषाचा मुलगा परिस्थितीमुळे मृत्यू पावला व सुनेला भीक मागत मरावे लागले, ही महाराष्ट्राची शोकांतिका असल्याची खंत डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केली. आज भारतासह जगात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्ता मिळविली जात आहे.
अस्मितेच्या प्रश्नात गुंतविले जात आहे. यावेळी अध्यक्षीय विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनीकेले. प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. संचालन प्रा. मनोज कासारे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आभारप्रदर्शन केले.(प्रतिनिधी)