महावितरणची फसवणूक : पतसंस्थेविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 09:00 PM2018-02-01T21:00:14+5:302018-02-01T21:02:37+5:30
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेकडील वीज बिल भरणा केंद्र्राचा परवाना रद्दबातल करण्यात आला असून ग्राहकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेकडे फेब्रुवारी २०१४ पासून महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र होते, मात्र जुलै २०१७ पासून या पतसंस्थेने ग्राहकांनी वीज बिल भरणा केलेल्या रकमेचा पूर्णपणे महावितरणकडे भरणा न करता महावितरणसोबत केलेल्या कराराचा भंग केला. जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल १९ लाख ७१ हजार ६४८ रुपये कमी जमा करीत या रकमेचा अपहार केला. सोबतच संस्थेने जुलै २०१७ पासून महावितरणला ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेचा हिशेब देणेही बंद केले होते. नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेने वास्तविकतेपेक्षा कमी रकमेचा भरणा केला असल्याचे लक्षात येताच याबाबत पाठपुरावा करण्यात आला असता संस्थेने त्यास प्रतिसाद न दिल्याने महावितरणने खापा पोलीस ठाण्यात सदर संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोबतच या संस्थेकडे वीज बिल स्वीकारण्याची असलेली परवानगीही रद्द केली आहे.
महावितरणच्या तक्रारीच्या अनुषंगाने खापा पोलिसांनी नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा दाखल होऊन सात दिवस होऊनही स्थानिक पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई न केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, या संस्थेला वीज बिल स्वीकारण्यास परवानगी नाकारल्याने वीज ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलांचा भरणा करू नये, असे आवाहनही महावितरणकडुन करण्यात आले आहे.