मविआचा ३३ जागांवर पेच, विदर्भातील चित्र; २९ जागांवर एकाच पक्षाने दावा केल्यामुळे मार्ग मोकळा
By कमलेश वानखेडे | Published: September 17, 2024 08:16 AM2024-09-17T08:16:30+5:302024-09-17T08:17:43+5:30
उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : महाविकास आघाडीच्या विदर्भातील जागा वाटपात सुमारे ५० टक्के जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे. विदर्भातील ६२ पैकी २९ जागांवर कोणत्याही एकाच पक्षाने दावा केला असल्यामुळे या जागांचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे.
विदर्भातील जागा वाटपात काँग्रेस नमते घेण्यास तयार नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये आजवर झालेल्या बैठकीत २९ जागा निकाली निघाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसच्या २४ जागा आहेत. शरद पवार गटाच्या चार, तर उद्धवसेनेच्या वाट्याची एकमेव जागा ‘क्लीअर’ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण - पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर या मतदारसंघांमध्ये एकाच पक्षाने दावा केला. प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या संबंधाने दुजोरा दिला आहे.
या जागांचा मार्ग मोकळा
नागपूर : काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर
भंडारा : साकोली
गोंदिया : आमगाव
चंद्रपूर : चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा व वरोरा
वर्धा : देवळी
अमरावती : तिवसा, अमरावती, मोर्शी व बडनेरा
यवतमाळ : आर्णी, राळेगाव, उमरखेड, पुसद
अकोला : बाळापूर, अकोला व अकोला पूर्व
बुलढाणा : मलकापूर, खामगाव व शिंदखेडा राजा
वाशिम : रिसोड
महायुतीत ७० टक्के जागांवर झाले एकमत
नागपूर : महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी ८० किंवा ९० अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह धरलेला नाही. जेथे अजित पवार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह, जिथे शिंदे सेनेचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह व जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू. आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचा ‘फॉर्म्युला’ निश्चित केला असून, आजवर ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे सत्ता दिली. ते कधी मंत्रालयात गेले नाहीत. विधानभवनातही गेले नाहीत. ते आता जुनी पेन्शन देऊ, असे खोटे बोलत आहेत. आमचे सरकार सगळे
प्रश्न सोडवत आहे. सोयाबीन, बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला. पीक हातात आल्यावर शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला लवकरच दिसेल.
‘काँग्रेसचा खरा चेहरा आला समोर’
संजय गायकवाड यांचे समर्थन करत नाही. आरक्षण रद्द करू, असे राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढ्यांच्या पोटात जे होते ते आज ओठावर आले.
काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसच आहे. जरांगे - पाटील यांनीसुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.