माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
By कमलेश वानखेडे | Published: August 10, 2024 04:40 PM2024-08-10T16:40:31+5:302024-08-10T16:41:01+5:30
परमविर सिंग खरे बोलले
नागपूर : परमबिर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफार्श करु शकलो. मी, प्रविण दरेकर, गिरीश महाजन अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले. माझ्या अटकेसाठी एकदा नाही तर चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळाले नाही. यांचे व्हीडिओ पुरावे सीबीआयला देण्यात आले आहेत. आजही आमच्याकडे अनेक व्हीडीओ पुरावे आहेत. योग्यवेळी ते सादर करू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. परमविर सिंग यांचे आरोप ते पूर्णपणे सत्य आहे. असे अनेक प्रयत्न झाले.
खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल, याचे षडयंत्र आखण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक आमच्या नेत्यांना अक्षरश: जेलमध्ये टाकण्याची सुपारी देण्यात आली होती. पण ते करू शकले नाही. कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी अशा खोट्या केसेस करायला नकार दिला, असेही फडणवीस म्हणाले.