नागपूर जिल्ह्यात नरखेडमध्ये महाविकास आघाडी, काटोलमध्ये राष्ट्रवादीला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 06:42 PM2021-10-04T18:42:48+5:302021-10-04T18:43:26+5:30
नागपूर जिल्ह्यात नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडी पॅनलने (काँग्रेस-केदार गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी) विजय मिळविला आहे.
नागपूर : नरखेड, काटोल आणि कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडी पॅनलने (काँग्रेस-केदार गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी) विजय मिळविला आहे. येथे बाजार समितीच्या निमित्ताने पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या गटाने डॉ. आशिष देशमुख यांच्या गटावर मात केली आहे. (Mahavikas Aghadi in Narkhed in Nagpur district, NCP defeated in Katol)
काटोल बाजार समितीत महाविकास आघाडीच्या (विशेषत: राष्ट्रवादी) शेतकरी विकास पॅनलला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजप समर्थित शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दमदार विजय मिळविला आहे. काटोल न.प.चे गटनेते चरणसिंग ठाकूर व सहकार क्षेत्रातील मात्तबर केशवराव डेहनकर यांच्या नेतृत्वात भाजपने येथे निवडणूक लढविली होती.
कळमेश्वर बाजार समितीवर काँग्रेसने (केदार गट) एकतर्फी विजय मिळविला आहे. येथे यापूर्वीच १५ संचालक अविरोध विजयी झाले होते. रविवारी ग्रामपंचायत मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. दोन्ही जागांवर केदार गटाच्या उमेदवारांनी भाजप समर्थित पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. उपरोक्त तिन्ही बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी संबंधित तालुकास्थळी सुरुवात झाली. नरखेड येथे सुरुवातीच्या कलात भाजप समर्थित बळीराजा सहकारी पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीचा बीपी वाढला होता. मात्र, अंतिम निकालात महाविकास आघाडीच्या पॅनलने बाजी मारली. येथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. आशिष देशमुख गट आणि भाजप समर्थित बळीराजा सहकारी पॅनलने ६ जागा काबीज केल्या आहेत. दोन जागांवर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत.
जि.प. व बाजार समितीच्या निवडणुकीत देशमुख भाजप उमेदवारांचा प्रचार करीत असल्याने त्यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. याची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे नरखेड बाजार समिती आणि नरखेड तालुक्यातील जि.प. सर्कलच्या पोटनिवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सोमवारी बाजार समितीचे निकाल जाहीर झाले. बुधवारी जि.प.चे निकाल जाहीर होतील.
नरखेड बाजार समिती
नरखेड येथे चार गटांत झालेल्या निवडणुकीत सहकारी संस्था गटातून ११ जागांपैकी महाविकास आघाडी पॅनलने ५ व बळीराजा सहकार पॅनलने ६ जागांवर विजय मिळविला. ग्रामपंचायत गटात ४ पैकी चारही जागांवर महाविकास आघाडी पॅनलला विजय मिळाला. अडते व व्यापारी गटात २ जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडी पॅनल व एका जागेवर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. हमाल व मापाडी गटातून एका जागेवर स्वतंत्र उमेदवार विजयी झाला.
काटोल बाजार समिती
काटोल येथे सहकारी संस्था गटाच्या ११ जागांपैकी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलच्या एकाही उमेदवाराला खाते उघडता आले नाही. येथे भाजप समर्थित शेतकरी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायत गटात ४ पैकी ३ जागांवर शेतकरी उत्कर्ष पॅनलने बाजी मारली. येथे एक जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाली. मात्र, व्यापारी अडते गटाच्या दोन्ही आणि मापाडी गटाची एक जागा महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलने काबीज केली आहे