घरोघरी महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:51+5:302021-04-26T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२० वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२० वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी घरोघरी साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे कडक निर्बंध असल्याने बहुतांश संस्थांनी महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. प्रत्यक्ष उपस्थिती शक्य नसल्याने व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उपराजधानीतील हजारो भाविकांनी ऑनलाईन माध्यमातून महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा केला व समाजासमोर एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला.
सध्याची स्थिती पाहता, श्रावकांनी घरीच महावीर जन्म कल्याणक साजरा करण्याच निर्देश जैन धर्माच्या साधू-संतांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून दिले होते. जैन मंदिरे दर्शनासाठी बंद असल्याने सकाळपासूनच श्रावकांनी घरीच महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा केला. महिलांनी सकाळी घरासमोर रांगोळी, घरावर जैन झेंडा लावला. घरोघरी अभिषेक, पूजन, तीर्थंकर प्रभूंसाठी पाळणा सजविण्यात आला होता व गीते सादर करण्यात आली. त्यानंतर एक-दुसऱ्याला समाज माध्यमांद्वारे, फोन करून शुभेच्छा दिल्या. श्री जैन सेवा मंडळाद्वारे मागील ८१ वर्षांपासून महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे सार्वजनिक आयोजन करण्यात येते. परंतु, यंदा संचारबंदीमुळे आयोजन रद्द करण्यात आले.
कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
इतवारी लाडपुरा निवासी नितीन नखाते यांनी निवासस्थानी महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन केले होते. सकाळी जिनेन्द्र भगवंताची महाशांतीधारा केली. श्री महावीर विधान, श्री पार्श्वनाथ विधान, विश्व शांतीसाठी शांती विधान केले. यावेळी संपूर्ण जगातून कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली.
ऑनलाईन भजनांचे सादरीकरण
अनेक श्रावकांनी विविध ऑनलाईन माध्यमातून भजन व गीतांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, नागपूरसह इतर गावांतील श्रावकांसोबतच सातासमुद्रापार राहणारे जैन बांधवदेखील यात सहभागी झाले होते.