दक्षिण नागपुरात महावीर ऑक्सिजन झोन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:03+5:302021-07-05T04:07:03+5:30
वृक्षारोपण करून महापौरांनी केला शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण नागपुरात भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्याच्या दृष्टीने ...
वृक्षारोपण करून महापौरांनी केला शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपुरात भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्याच्या दृष्टीने महापालिका व महावीर युथ क्लबच्या वतीने पाच हजार वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. या माध्यमातून ऑक्सिजन झोन तयार करण्यात येणार आहे. रविवारी महावीर नगरातील जैन मंदिर प्रांगणात वृक्षारोपण करून महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर नगर सुधार समितीचे अध्यक्ष अनिल गवारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष पेंढारी जैन उपस्थित होते.
यावेळी वृक्ष दिंडी काढण्यात आली. महावीर नगर मैदानात महापौरांसह उपस्थित नागरिकांनी २५० झाडांचे रोपण केले. यावर्षी देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. महावीर ऑक्सिजन झोन तयार करण्यासाठी महावीर युथ क्लब परिवार, महावीर नगर सुधार समिती, श्री महावीर सहकारी गृह निर्माण संस्था, बाबूलालजी टक्कामोरे स्मृती संस्था सहकार्य करीत आहे. कार्यक्रमाचे आयोजन महावीर युथ क्लब दक्षिण तर्फे करण्यात आले होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार ना.गो. गाणार, नगरसेवक रवींद्र भोयर, प्रशांत धवड, नगरसेविका शीतल कामडे, विदर्भ सेवा समितीचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष मोदी, महावीर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भुसारी, बाबूलाल टक्कामोरे स्मृती संस्थेचे प्रमुख अजय टक्कामोरे, जैन सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष सतीश पेंढारी जैन, अखिल दिगंबर सैतवाल जैन संस्थेचे राजेंद्र नखाते, महावीर युथ क्लबचे केंद्रीय अध्यक्ष दिनेश सावलकर, केंद्रीय उपाध्यक्ष मंगेश बिबे, श्री सैतवाल जैन संगठन मंडळाचे ट्रस्टी प्रशांत सवाने, भाजपचे प्रशांत कामडे, चंद्रकांत खंगार, अशोक पटेल उपस्थित होते. सचिव गौरव शाहाकार, प्रवीण कापसे आदी उपस्थित होते. संचालन केंद्रीय सचिव प्रशांत मानेकर यांनी केले. प्रास्ताविक गौरव शाहाकार यांनी तर आभार डॉ. रवींद्र भुसारी यांनी मानले.