वीज कर्मचारी संपावर; अन्य विभाग व एजन्सींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:24 AM2023-01-04T11:24:57+5:302023-01-04T11:31:15+5:30
खापरखेडा येथील वीज केंद्राच्या प्रवेशद्वारापुढे रात्री १२ वाजता आंदोलक कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी
नागपूर : वीज वितरण यंत्रणेचे खासगीकरण करण्याच्या विरोधात राज्यभरातील वीजकर्मचारी मंगळवारी रात्री १२ वाजेपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. या संपात ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. दरम्यान, महाजनकोने मुंबई येथे कार्यरत अभियंत्यांना वीज केंद्रात तैनात केले आहे. दुसरीकडे महावितरणने अन्य सरकारी संस्था व एजन्सींच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. तर महापारेषणने पॉवर ग्रीडची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी रात्री १२ वाजताच महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सबस्टेशनमध्ये जाऊन कार्यरत कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. पुढील तीन दिवस कोणत्याही कामात सहभाग घेतला जाणार नाही. असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संपाचा विचार करता वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कंपनीने तयारी केली आहे. २४ तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. कंपनी संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. एजन्सी तसेच कंत्राटी कर्मचारी, सेवानिवृत्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम, विद्युत निरीक्षक व महाऊर्जाच्या अभियंत्यांना सब स्टेशनमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. संपाला पाठिंबा देणाऱ्या एजन्सींना तत्काळ बडतर्फ करण्याचा इशारा दिला आहे.
ऊर्जामंत्री कामगार संघटनांशी चर्चा करणार
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दुपारी एक वाजता मुंबई येथे कामगार संघटनांसोबत चर्चा करणार आहेत. वीज कंपन्यांनी संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.