महावितरणची सौर ऊर्जा निर्मितीत घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 08:53 PM2018-09-21T20:53:01+5:302018-09-21T20:58:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ६६५ कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील ९०० कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ६६५ कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील ९०० कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
महावितरणच्या बुटीबोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र्रातील सुमारे अडीच एकर मोकळ्या जागेत या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी येथून तब्बल ३०१ के.वॅ. ऊर्जा निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असून या प्रकल्पांतून परिसरातील शेतकऱ्यांना सौर वीज वाहिनीतून वीजपुरवठा करण्यात येईल.
मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी असलेल्या महावितरणच्या वीज उपकेंद्रातील उपलब्ध मोकळ्या जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत योजना तयार केली असून या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील उपकेंद्रात ९०० कि.वॅ. तर बुटीबोरी येथील उपकेंद्रातील ६६५ कि.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले आहेत. खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पातूनही तब्बल ५०० कि.वॅ. पर्यंत ऊर्जा निर्मितीची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे १५० ठिकाणी विविध क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून २०० मे. वॅ. वीज निर्मिती करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी महावितरणने प्रकल्प उभारणी आणि वीज खरेदीसाठीचे करारही केले असून. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा महावितरणची आहे तर प्रकल्प उभारणीचे काम ईईएसएल या कंपनीतर्फे करण्यात येत आहे. बुटीबोरी येथील प्रकल्पातून सुमारे ३०० शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार असून शेतकऱ्यांना दिवसा १० ते १२ तास दर्जेदार आणि स्वस्त वीज मिळावी याकरिता राज्य शासनातर्फे ही योजना राबविल्या जात आहे.