महायुतीचे ८० टक्के जागावाटप निश्चित, ठाकरेंच्या मागे जनता नाही; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा
By योगेश पांडे | Published: March 11, 2024 06:45 PM2024-03-11T18:45:38+5:302024-03-11T18:47:01+5:30
नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकसभा निवडणूकांत राज्यात महायुतीच्या जागावाटपावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ८० टक्के जागांचे निर्णय झाला असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल, असा दावा केला आहे. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीच्या राजकारणाचा आधार जनतेत संभ्रम पसरविण्याचा आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. महायुतीमधील घटक पक्षांना पूर्ण सन्मान दिला जातो. महायुतीच्या ८० टक्के जागांचा निर्णय झाला असून उर्वरित जागांवर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. महायुतीमध्ये कोणताही ताणतणाव नसून सर्वांचे एकमत आहे. दिल्लीत महायुतीची बैठकीत यावर चर्चा झाल्यावरच उमेदवारीबाबत योग्य निर्णय होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी चौकशीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले, ज्याला कर नाही तर डर कशाला! चूक केली नसेल तर ईडीच्या नोटीसचे उत्तर साधेपणाने देता येते. चौकशीअंती निष्कर्ष निघेलच. मात्र ते सोडून तपास यंत्रणांवर दबाव आण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.
उद्धव ठाकरेंच्या मागे जनता नाही
जेव्हा लोकांचे भले करण्याची संधी तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसून होते. जनता समजुतदार असून उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहणार नाही, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला. मनसे व भाजपवरदेखील त्यांनी भाष्य केले. राज ठाकरे हे परखड बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे. मनसे व भाजपची भूमिका विसंगत नाही. परंतु त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.