अन् कॉन्व्हेंटमध्ये शिकण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:04 AM2018-06-02T11:04:19+5:302018-06-02T11:04:27+5:30

जानकीनगरातील न्यू इरा इंग्लिश स्कूलचे संचालक रमेश तळेकर यांना माहेश्वरीची परिस्थिती समजली अन् त्यांनी तिला मदत करण्याचे ठरविले. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले.

Maheshwari's dream of learning in the Convent was completed | अन् कॉन्व्हेंटमध्ये शिकण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले

अन् कॉन्व्हेंटमध्ये शिकण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले

Next
ठळक मुद्देरमेश तळेकर यांनी दिला मदतीचा हात बिकट परिस्थितीत जगणाऱ्या कुटुंबाला आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार महिन्यांची असताना चिमुकल्या माहेश्वरीच्या आईचे छत्र हरविले. आई पाठोपाठ वडिलांचाही आजारपणामुळे मृत्यू झाला. कसेबसे आजीने तिसरी पर्यंत शिकविले. परंतु बिकट परिस्थिती असल्यामुळे पुढे शिक्षण देणे आजीलाही जमले नाही. अखेर जानकीनगरातील न्यू इरा इंग्लिश स्कूलचे संचालक रमेश तळेकर यांना माहेश्वरीची परिस्थिती समजली अन् त्यांनी तिला मदत करण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या कॉन्व्हेंटमध्ये तिच्या शिक्षणाची सोय करून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले.
माहेश्वरी मदन टेंभरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. माहेश्वरी चार महिन्याची असताना सिकलसेलच्या आजाराने तिच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांनी तिचे पालनपोषण केले. परंतु वडिलांचाही आजारपणामुळे मृत्यू झाला. माहेश्वरीच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या आजीवर आली. आजीने बिकट परिस्थिती असतानाही माहेश्वरीला कसेबसे तिसरीपर्यंत शिकविले. परंतु पुढे शिकविणे तिलाही कठीण झाले. अखेर माहेश्वरीला तिची आत्या शुभांगी शेंडे या दक्षिण नागपुरातील विठ्ठलनगरात घेऊन आल्या. त्यांनाही परिस्थितीमुळे माहेश्वरीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविणे कठीण होते. ही बाब जानकीनगरातील न्यू इरा इंग्लिश स्कूलचे सचिव रमेश तळेकर, कल्पना तळेकर यांना समजली. माहेश्वरीला आईवडिल नसून तिची इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याची इच्छा असूनही ती परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. लगेच त्यांनी माहेश्वरीच्या आत्याला निरोप देऊन त्यांना आपल्या कॉन्व्हेंटमध्ये बोलावले. त्यांनी माहेश्वरीला आपल्या कॉन्व्हेंटमध्ये चौथ्या वर्गात प्रवेश दिला.
एवढेच नव्हे तर तिच्या शिक्षणाचा खर्चही उचलण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे गरीब माहेश्वरीचे आयुष्य सावरण्यास मदत होणार आहे, हे निश्चित.

Web Title: Maheshwari's dream of learning in the Convent was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.