बचत गटांच्या महिलांनी परत केले ४२ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:46 PM2018-04-20T23:46:44+5:302018-04-20T23:50:44+5:30
बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळत आहे. अशा कर्जबुडव्यांना आणि बँकांना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लावली आहे. या महिलांनी विविध बँकांकडून घेतलेले ४२ कोटी रुपयांचे कर्ज एकही हप्ता न चुकविता परत केले आहे. अशिक्षित, गरीब महिलांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा खरोखरच देशहिताचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळत आहे. अशा कर्जबुडव्यांना आणि बँकांना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लावली आहे. या महिलांनी विविध बँकांकडून घेतलेले ४२ कोटी रुपयांचे कर्ज एकही हप्ता न चुकविता परत केले आहे. अशिक्षित, गरीब महिलांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा खरोखरच देशहिताचा आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या पाऊलवाटा दाखविल्या आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वत:चा, कुटुंबाचा आणि गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा प्रोत्साहन देत आहे. महिलांची प्रगती साधण्यासाठी या यंत्रणेने महिलांना कर्जाचा पुरवठा केला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २६६९ महिला बचत गटांना ४२.६३ कोटी रुपयांचे कर्ज यंत्रणेने उपलब्ध करून दिले होते. त्याची १०० टक्के परतफेड या महिलांनी केली आहे.
महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण विकास यंत्रणेला टार्गेट देण्यात येतो. यात बचत गटांची निर्मिती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणे या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य व स्वावलंबी बनविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने यावर्षी १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
बचत गटांची व्यावसायिक वाटचाल
यंत्रणेच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील काही महिला बचत गटांनी सॅनिटरी नॅफकीन, सेंद्रीय खताची निर्मिती, ज्वेलरी, शर्ट, बॅग, मेणबत्ती, अगरबत्ती व छोटेमोठे गृह उद्योग लावले आहे.