'महिला कट्टा' हे स्त्रियांच्या आत्मविश्वासाला वाढवणारे व्यासपीठ ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 10:03 PM2023-03-11T22:03:37+5:302023-03-11T22:04:43+5:30
Nagpur News ‘महिला कट्टा’ हे बहुआयामी व्यासपीठ स्त्रियांच्या सक्षमीकरणास पाठिंबा देणारे व त्यांच्या आत्मविश्वासाला वाढवणारे ठरेल, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी येथे व्यक्त केला.
नागपूर : ‘महिला कट्टा’ हे बहुआयामी व्यासपीठ स्त्रियांच्या सक्षमीकरणास पाठिंबा देणारे व त्यांच्या आत्मविश्वासाला वाढवणारे ठरेल, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी येथे व्यक्त केला. सेवा, पाठबळ आणि उत्कर्ष या त्रिसूत्रीवर आधारित 'महिला कट्टा' या विचारपीठाचे उद्घाटन डॉ. बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांमधील नेतृत्वगुणांचा विकास, उद्यमशील महिलांना पाठबळ, अन्यायग्रस्त महिलांना आधार व मार्गदर्शन आदी उपक्रमांसह एकूण २० विचारपीठांनी युक्त असलेल्या महिला कट्ट्यामधील महिलांनी आपल्या जवळच्या किमान ५ महिलांना सक्षम करावे, असे मत व्यक्त करून डॉ. बिदरी यांनी महिलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात उतरावे, असे आवाहनही केले.
कट्ट्याच्या संयोजिका प्रगती पाटील यांनी प्रास्ताविकातून महिला कट्ट्यामागील भूमिका विशद केली. स्त्रिया अनेक क्षेत्रात पुढे जात असल्या तरी त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराची शृंखला चालूच आहे याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांना या शृंखलेतून मुक्त करण्याचा हेतू या कट्ट्याच्या निर्मितीमागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कट्ट्यात राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, कामगार, उद्योग, क्रीडा, साहित्य, सामाजिक, समुपदेशन, माध्यमे अशा एकूण २० विचारपीठांचा समावेश राहणार आहे. या विचारपीठांवर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ महिला राहणार असून, त्या गरजू महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर व सना पंडित यांनी केले.