नागपुरात चारित्र्यावर संशय घेऊन महिमाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 09:03 PM2018-05-02T21:03:45+5:302018-05-02T21:06:39+5:30
चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.
आसिफने ३० एप्रिलला रात्री मानकापूर ठाण्याजवळ शिवनगरात २० वर्षीय महिमाचा खून केला होता. आसिफ आधी मानकापूर परिसरात राहत होता. त्याचे दोन-तीन वर्षे महिमासोबत प्रेमसंबंध होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही दीड वर्षापूर्वी पती-पत्नीसारखे राहु लागले. महिमाला कुटुंबीय आणि इतर नागरिकांनी आसिफपासून दूर राहण्याबाबत समजवले होते, परंतु तिने कुणाचेच ऐकले नाही. पाच-सहा महिन्यानंतर दोघात भांडणे होऊ लागली होती. महिमा आसिफला सोडून आईवडिलांच्या घरी राहू लागली. महिमा गेल्यानंतर आसिफला तिचे इतरासोबत प्रेमसंबंध असल्याची शंका येऊ लागली. या गोष्टीवरून तो महिमासोबत वाद घालत होता. महिमाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. ३० एप्रिलला रात्री आसिफने चर्चा करण्याच्या बहाण्याने महिमाला घराजवळ बोलावले. आसिफच्या मते त्याने महिमाला सोबत राहण्यासाठी समजावले. तिने नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान त्याने महिमाचा खून केला. त्याने महिमाचा गळा कापला होता. आसिफच्या मते तो महिमावर प्रेम करायचा. त्यामुळे अशा पद्धतीने त्याने तिचा खून करणे आश्चर्याची बाब आहे. यात आसिफ खरी हकीकत लपवित असल्याची शंका पोलिसांना आहे. तो ३ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. महिमाच्या खुनामुळे मानकापूर ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे.