कोविडच्या मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:59+5:302021-05-31T04:07:59+5:30
मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्या उद्देशाने महामेट्रोतर्फे मेट्रो गाड्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण आणि गर्दीची मेट्रो स्थानके तसेच क्रू कंट्रोल रूम, बेबी ...
मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्या उद्देशाने महामेट्रोतर्फे मेट्रो गाड्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण आणि गर्दीची मेट्रो स्थानके तसेच क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम आणि स्टेशन कंट्रोल रूम आदी वारंवार स्वच्छ केल्या जातील. याव्यतिरिक्त मेट्रो कर्मचारी पीपीई किटसह मास्क आणि हँड ग्लोव्हज घालून कार्यरत असतील, तसेच केंद्र आणि राज्य शासनाने कोविड-१९ महामारीकरिता वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात येईल. शासनाने जारी केलेल्या निर्देशांविषयी प्रवाशांना, तसेच मेट्रो कर्मचाऱ्यांना नियमित सांगण्यात येईल. कोविडसंबंधित जागरूकता नियमितपणे मेट्रो स्टेशन आणि मेट्रो रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या स्पीकरद्वारे घोषणा केल्या जातील, तसेच मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांकरिता सूचना फलक लावण्यात येतील.
मेट्रो स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले असून, मेट्रो प्रवाशांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना पाळण्यास सांगितले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने मेट्रो प्रवासाचे भाडे द्यावे या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. त्यानंतरही कुणी रोख देऊन तिकीट घेतले, तर त्या नोट किवा नाण्यांचे यंत्राच्या माध्यमाने निर्जंतुकीकरण करण्यात येईल. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवासी सुखरूप असावेत या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न मेट्रो प्रशासन करत आहे.